दररोजच्या आपल्या Lifestyle मध्ये, अगदी सहजतेने कुठली गोष्ट घडत असेल तर ती कोणती असा प्रश्न जर स्वतःलाच विचारला तर बऱ्याच जणांना मान्य होईल असं उत्तर म्हणजे "अपेक्षा" हेच असावं. खूप साधी गोष्ट असते एखादी, ती करावी, की करू नये, कोणी करावी, कोणी करू नये, का करावी आणि का करू नये अशा छोट्या छोट्या अपेक्षा असतात आपल्याला. त्यातही पाहायला गेलं तर दोन प्रकारच्या अपेक्षा आपल्याला पाहायला मिळतील. एक म्हणजे स्वतःकडून असणाऱ्या आणि दुसऱ्या म्हणजे आपल्या आप्तेष्ट,स्वकीय, मित्र-मैत्रिणी वा अन्यांकडून असणाऱ्या अपेक्षा. न्याय कुठल्या अपेक्षांना द्यायला पाहिजे हे सर्वश्रुत आहे. आपणच स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण कराव्या. किंबहुना आपणच स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षा डोळसपणे बघाव्या, त्यांचा विचार करावा, आणि नसतीलच तर आधी त्या ठेवाव्या. सर्वश्रुत असणाऱ्या गोष्टी सर्वकृत असतीलच असं नव्हे. किंबहुना बहुतांश वेळी त्या नसतातच. आता आपल्या सगळ्यांना WhatsApp, Facebook इ. Social Media वर म्हणा किंवा एकंदरीत त्या तळहाताएवढ्या Mobile वर दिवसाचा किती वेळ जातो हे माहितीच आहे. तो जाऊ नये, त्याचे तोटे, वाईट परिणाम आज त्याच्याच मदतीने सर्वश्रुत आहेत. पण करण्याची वेळ येते तेव्हा आपण मागे हटतो. म्हणून हे सर्वकृत होत नसावं. कारण सुरुवात आपण करूया ही आपण स्वतःकडूनच "अपेक्षा" ठेवत नाही हे ही तितकंच खरं म्हणायचं.
आपल्या चालीरीती, परंपरा, आपण पाहिलेले समाजजीवन, ह्या समाजातील आपल्यासोबत वावरणारा वर्ग ह्यांचा आपल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पगडा बसलाय की थोडंसं त्यांच्यापेक्षा वेगळं वागलं की ते आपल्याला वाळीतच टाकणार आहेत असं आपण अपेक्षित धरून चालतो. म्हणून आपण काय करावं हे सोडून समोरच्याने काय करावं ही साधारण अपेक्षा आपण करतो. आणि हाच आपल्या समाजाचा आजचा स्वभाव बनलाय , दृढ होत चाललाय. जेव्हा मी ह्या सगळ्याचा खोलात जाऊन Generalised विचार केला तेव्हा मला जाणवायला लागलं की आपले सुख, दुःख, आनंदाचे क्षण, हे सगळे दुसऱ्यांवरच अवलंबून आहेत. ते आपल्या अपेक्षेप्रमाणे वागले तर आपल्याला आनंद होईल. आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही झालं तर आपल्याला वाईट वाटेल. आपला आनंद वा समाधान दुसऱ्यांच्या कृतीवर विसंबून आहे हे म्हणजे असं झालय की स्वतःला भूक लागल्यावर दुसऱ्यांनी जेवण केलं तरी पोट मात्र आपलंच भरणार. आज असं होताना आपण बघतोय, अनुभवतोय, अगदी छोट्या गोष्टींमध्येही.
मग अपेक्षा करणंच चुकीचं का असा प्रश्न मला पडला. उत्तरही मिळालं. वेळ दिला की सगळे उत्तरे आपल्याला मिळतात फक्त त्यांना त्यांचा वेळ दिला पाहिजे. घाई न करता. अपेक्षा हा मानवी स्वभावाचा एक अंगभूत गुण आहे. म्हणून अपेक्षा करणं हे चूक नव्हेच. अगदी स्वतःकडूनही आणि दुसऱ्याकडूनही. पण आपण त्या अपेक्षेचं ओझं लादतो. समोरच्याने अश्याच पद्धतीने, अशाच प्रकारे पुढे गेलं पाहिजे हा आपला आग्रह असतो. त्या आग्रहामुळे आणि ओझ्यामुळे पुढचा मनस्ताप आपल्यालाच झेलावा लागतो. म्हणून अपेक्षा असणं स्वाभाविक आहे पण ती पूर्ण झाली तरच आनंद आहे हे अस्वाभाविक आहे. ह्या "तरच" मधला "च" मनाला समाधान लाभू न देण्यासाठी कारणीभूत ठरतो. ती पूर्ण झाली तर आनंद आहेच पण नाही झाली तर अगदीच काही बिघडणार नाही. कारण छोटी असो वा मोठी शेवटी ती अपेक्षा आहे. दुसऱ्यांकडून असणारी. तिला छोटेपण आणि मोठेपण आपणच दिलेलं असतं. तिच्याही नकळत. म्हणून त्यांना पूर्ण "च" होण्याचा अधिकार जन्मापासून मिळालेला नाहीये. आणि तो मिळावा म्हणून आपणही प्रयत्न करू नये. कारण जन्मतः असणाऱ्या गोष्टी आयुष्यभर साथ देतात. त्यात बाहेरून बदल केला तर विद्रूपपणा येतो. म्हणून त्या अपेक्षेसोबतही न झटलेलंच बरं.
मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये आजकाल ह्या अपेक्षांना धरून घराघरांमधे होणारे भांडणे, त्यांच्या अवाजवी किंवा त्यांच्या दृष्टीने असणाऱ्या अगदी साध्या अपेक्षा असे विषय खूप बहखूबीने हाताळलेले आपण पाहतो. बऱ्याच वेळा बऱ्याच अंशी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्नही त्यांनी केलाय. पण आपण त्यांनी केलेले प्रयत्न तेवढी वेळ सोडली तर त्यांच्या जवळच ठेवून परत येतो. इंग्रजीमधे दोन शब्दात ह्याच छान वर्णन केलय. ते म्हणजे "Expectations Hurts." आणि ते खरंच आहे. म्हणून That must be done or say मधल्या Must ची जागा May or May not नेच घेतलेली बरी. आणि म्हणूनच इंग्रजीमधल्या Must आणि मराठीमधल्या "च" (केलंच, बोललंच ई.) सोबत आपली दोस्ती न झालेलीच फायदेशीर आहे.
अध्यात्मामधली "साक्षीभावाची" संकल्पना एकदा वाचनात आली होती आणि ती ह्या सगळ्याला उत्तर असू शकते असं वाटत. त्या संकल्पनेनुसार "चांगलं झालं तरी मी उतावळेपणाने त्याच स्वागत करणार नाही किंवा मनासारखं झालं नाही तरी मी राग राग नाही करणार. ह्या दोन्ही वेळेस मी शांतपणे परिस्थितीला सामोरे जाईल. चांगलं झालंच तर मला आनंद नक्कीच होईल पण तो केवळ त्याच गोष्टींवर अवलंबून राहणार नाही. मी माझ्या Stable State ला लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेल. दुःख झालं किंवा मनासारखं नाही झालं तर त्याचा स्पर्श माझ्या मनाला नक्कीच होईल पण त्याचा परिणाम मी माझ्या मनावर होऊ देणार नाही. हा भाव जपणं म्हणजे साक्षीभाव." तो येण्यासाठी Practice करावी लागेल. पण येईल अशी अपेक्षा स्वतःकडून ठेवायलाच हवी. हो इथे "च" आवश्यकच आहे कारण ती अपेक्षा स्वतःकडून आहे.
आज अचानक लिहावंसं वाटलं म्हणून लिहायला बसलो. साहजिकच माझीही माझ्याकडून अपेक्षा होती ह्या "अपेक्षेवर" लिहावं अशी. ती चांगल्या पद्धतीने पूर्ण पडली की नाही ह्याची माहिती नाही किंबहुना त्याची गरजही नाही. पण पूर्ण करण्याचा प्रयत्न मी माझ्याच कडून मात्र प्रामाणिकपणे केलाय ह्याच समाधान नक्कीच आहे.
अगदी माझ्याच वरच्या अपेक्षेप्रमाणे..
- मकरंद
