बुधवार, ३ डिसेंबर, २०१४

रंग मनाचे...



         रात्र झाली होती. मन बेचैन होत. Mob नकोसा झाला होता. पुस्तक वाचवं वाटत नव्हत. TV पहावासा वाटत नव्हता. विचार कोणता आणि कोणाचा शोध घेत होते हे जाणून घ्यावस वाटत नव्हत. झोप येत होती पण झोपावही वाटत नव्हत. जे होतंय ते चालू ठेवण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हत. मला एकच पर्याय दिसला. कागद आणि पेन…
एका Relaxation साठीचा माझ्यावरचा माझा दरवेळेसचाच प्रयोग..
         मघाशी Facebook वर एका अनोळखी व्यक्तीला Message पाठवला होता. का पाठवला मलाही नव्हत कळालं. पण मन म्हणालं आणि पाठवला. Mutual असणारा असा एकच धागा होता आमच्या दोघांमधे. वपु.. 
आयुष्याच्या मर्यादेला अडवू न शकणाऱ्या या माणसाने आयुष्य जगताना अनेक माणसे निःसंदेह्पणे जोडली असतीलच. पण आजही तुम्ही अमर्याद माणसांना जोडून ठेवणारा, कधीच न तुटणारा, एक पक्का धागा बनला आहात वपु. खरंच… तुमच्या गाठीने मैत्रीच्या दोन धाग्यांना जोडण्याचा प्रयत्न आज पुन्हा एकदा नकळत  घडून गेला. 'तो' कोण आहे हे माहिती नसूनही…
         वपु आजपर्यंत तुम्ही मला अनेक वेळा मदत केलीये. माझ्याही नकळत. मग माझ्या मनातील भावनांना शब्दांच रूप देण्यासाठी आजही तुम्ही याल ना..?
तुमच्या खास शैलीतील शब्दभावांसहित..

        कितीही लिहीलं तरी अपूर्ण असणारं आपलं मन.. त्याच्या त्या भावना..अन् त्यांचा तो खेळ.. प्रत्येक खेळ त्या मनापासुनच चालू होतोय. तो संपेल असं वाटत नाही. किंबहुना संपवावासा असही वाटत नाही. त्याला चालवणं आणि थांबवण आपल्याच हातात असत हे माहिती असूनही मन त्या भावनांच्या खेळत का रमत असेल..? का थांबवत नसेल ते त्या खेळांना..? भावनेच्या प्रत्येक खेळात प्रेमाचं वर्चस्व का असतं ..? असत काय हे प्रेम..? सांगा ना वपु..  का रमावं वाटतं माणसाला या भावनेत..? का हव असत त्याला हे प्रेम..? खरंच असत काय हे प्रेम म्हणजे…?    

        काय सांगु मी तरी तुला प्रेमाबद्दल..? ज्या भावनेला आणि तिच्या या खेळाला अनुभवल्याशिवाय त्याची अनुभूती येत नाही, तिला शब्दभावाचं रूप मी तरी कसं देऊ..? शब्दांच्या धाग्यांमधे प्रेमाला गुंफण्यासाठी आज मलाही कसरत करावी लागणार आहे..तुझ्यासाठी..तुझ्यासारख्याच अनेकांसाठी...

प्रेम..
"तू माझा आहेस आणि मी तुझी आहे" ही भावना ज्याच्याबद्दल आपल्या मनात घर करु पाहते ते 'प्रेम' असतं. मग ती व्यक्ती असो,वस्तु असो, प्राणी असो, सजीव असो वा निर्जीव असो..ते प्रेमच असतं. त्याला विशिष्ट अशी व्याख्या नाही. पण पैलू मात्र अनेक आहेत.
         स्वतःच्या नवजात बाळाला पाहून प्रसुतीच्या असह्य वेदना विसरणाऱ्या मातेच्या चेहऱ्यावर हसु फुलवणारं असतं हे प्रेम..
         ह्याच लेकराच्या प्रत्येक यशात आई-बापाच्या डोळ्यात आनंदाश्रु आणणार असत हे प्रेम..
         त्याच्याच अपयशात त्याला पक्का आधार देणारं असत हे प्रेम..
         निर्जीव वस्तुतही सजीवतेचा भास करून देणार असत हे प्रेम.. 
         इवलुश्या झाडाच्या 'बी' ला रक्ताच्या लेकरासारखं जपुन त्याला वटवृक्ष करणार असत ते फक्त प्रेमच..
         कितीही भांडणे झाली तरी आणि कितीही बोलायचं नाही ठरवल तरी भाऊ-बहिणींना एकत्र जोडून पुन्हा हसत करणार असत ते प्रेमच..
         दूर असणाऱ्या व्यक्तींच्या आठवणीत रमणाऱ्या मनात ठाचुन भरलेल असत ते केवळ प्रेमच..
         अन् कधी कधी ह्याच आठवणींनी स्वतःला बेचैन करणारं असत तेही हे प्रेमच..

        आजच्या या तुमच्या काळात तुम्ही खरच या प्रेमाचा पोरखेळ करुन टाकलाय. हातात हात घालून फिरणाऱ्याला, खांद्यावर हात टाकून हुंदडण्याला तुम्ही प्रेम समजता..? आणि नको वाटल की खुशाल Breakup करता. अरे खऱ्या प्रेमाला अंतच नसतो. एकांतसुद्धा त्याला स्वतःपासून दूर ठेवू शकत नाही. तुमच्या हातात हात घालून फिरण्याने निसटत्या स्पर्शाची चाहुलच घालवुन टाकली. १५-१५ तासांच्या सहवासाने नजरेला मिळणाऱ्या क्षणिक नजरेची मजाच घालवून टाकली. मग तुमचं  हे So Called Breakup होणारच. आणि दुराव्याची सवय नसल्याने पुन्हा Patchup चा फंडाही तुम्ही शोधुन काढलात. अरे वेड्यांनो, ही Breakup-Patchup  ची गणितं खऱ्या प्रेमात चालतच नाहीत. तिथला दुरावा हा मर्यादितच असतो अमर्याद सहवासासाठी.
संयमान केलं तर प्रेमही फुलतं नाहीतर तुमच्या Breakup-Patchup चा खेळ बनून जात.
      वयानुरूप प्रेमाची व्याख्या बदलत जाते. लहानपणी आपल्याच घरापुरत मर्यादित असणारं आपलं प्रेम, वाढत्या वयानुसार पंख पसरू लागतं. तुमच्या या तरुण वयाला खऱ्या प्रेमाच्या मार्गावर चालवणं हिच तुमची खरी कसोटी आहे. कारण भाषा कितीही शुद्ध असली तरीही मनाचे सर्वच भाव त्यात व्यक्त करता येतातच असं नाही. आणि प्रेम हे असचं असतं. शब्दांपलीकडचं.. मनाला मनांशी जोडणारं.. अदृश्य असणारं.. पण सतत हवहवसं वाटणारं…!! 

        आत्ता उठलोय. मला रात्री कधी झोप लागली ठाऊक नाही. किंबहुना रात्रीच मला जास्त काही आठवतही नाहीये. मी लिहित बसलो होतो एवढच आठवतंय. उठलो तेव्हा कागदं उशाशी अस्ताव्यस्त पडले होते. पेन हातात तसाच होता. आणि हे सगळं वाचुन मीच स्तंभित झालोय. मनातील प्रश्न डोकं वर काढतायत.
अस्पष्ट उत्तरांसहित..
दूरवर कुठेतरी असणाऱ्या व्यक्तीला आपल्या जवळ बोलावण्याची, आपलंस करण्याची ताकद खरंच या प्रेमात असते..?

आणि जर असेल….

तर काल रात्री ते वपु...??

              -मकरंद

                     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: