सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

भावबंध..

              विचारातील भावनांना आज बऱ्याच दिवसांनी शब्दात उतरवावस वाटलं. त्या 'नंतर लिहू' ला सुद्धा हातातील पेनाने त्याच्या पूर्ण शक्तीने बाजूला सारलं. कदाचित हे दूर सारणं कायमचच असाव असं त्या पेनालाही वाटल असाव. असो..
              कॅमेऱ्यामधे बंदिस्त केलेले एकेकाळचे Photos आपल्याला नंतर कधीकाळी पाहताना त्या गेलेल्या काळाशी, त्या प्रसंगांशी, त्या आठवणींशी किती समरस करून टाकतात. ते समरस होणं विचारांना कितीतरी पटींनी चालना देतं. त्या विचारांत, त्या काळात स्वतःला हरवून टाकतं, गुंतवून टाकतं. हे सगळं घडत एकटं असताना. सोबतीला कोणी असतं तेव्हा संवादही आपसूकच असतो आणि जेव्हा संवाद असतो तेव्हा विचारांच अस्तित्व फार काळ टिकत नाही. विचारातून संवाद नक्कीच येऊ शकतो. परंतू संवाद चालू असताना विचारांना स्वतंत्रतेची मुभा नसते. ते क्षणिकच ठरतात, आणि पुन्हा त्याच गहनतेने तो येईलच याची शाश्वतीही नसते. म्हणून त्यांना एकटेपणा आवडतो. त्यांच्या स्वतंत्रेसाठी, जगण्यासाठी आणि कदाचित त्यांच्याच स्वार्थासाठीही..
            सहज दिदिच्या लग्नाचे Photos बघत बसलो होतो. बघता बघता दोन वर्ष निघून गेली. आज ते Photos पाहताना वेगळ्याच दृष्टीकोणातून वाटून गेलं, ''किती ही माणसं..? नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, आपल्या आयुष्यात आपणहून जोडलेली, कधी नकळत जोडलेली पण आपलीशी झालेली, अन् कधी नात्यांचा भाव असणारी, त्याला प्रेमाने जपणारी, पण त्या नात्यातील भावाला नाव नसलेली ही माणसंच माणसं..''
           ५०-६० वर्षांच्या त्यांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात ''त्या दोघांनी'' जोडलेली ही माणसं पाहिली आणि वाटून गेलं, खरचं आपल्याला जोडता येतील का त्यांच्यासारखी एवढी माणसं..? जोडली तरी त्यांच्यासारखीच टिकवता येतील का ही माणसं..? अनुवांशिकतेमधून मिळालेल्या अनेक गुणांमधे हा ही गुण मला भरघोस मिळालेला असावा, अन् तोही दोघांकडून.. मला असं न राहवून वाटून गेलं.
''ती दोघं'' म्हणजे आई-बाबा.. आणि त्यांनी जोडलेली ही अगणित, प्रेमळ माणसं..

          आयुष्यात नाव, पैसा, गाडी, बंगला ह्या गोष्टी जितक्या आवश्यक वाटतात त्याहीपेक्षा आपण जोडणारी, जोडलेली माणसं महत्वाची असतात. त्यांच्या मागे धावता धावता माणसांच्या मागेही जाणूनबुजून धावायचं असतं ह्याचा विसर आपल्याही नकळत आपल्याला पडून जातो. पैसा हातातून निसटला तर मिळवता तरी येतो. माणूस निसटतो तो कायमचाच.. 
           आयुष्य म्हणजे एका बाजूला उंचच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला असणाऱ्या खोल दरीच्या मधला निमुळता, वळणावळणाचा रस्ता. त्या रस्त्यावर हातात हात धरून चालणारी आपण माणसं. जेव्हा एखाद्याचा हात सुटतो तेव्हा त्याला स्वतःहून सांभाळायचं असतं. ते फक्त आपल्याच हातात असतं. आपण हात सोडला तर कदाचित तो दरीत कोसळू शकतो. कायमचाच. पण त्याचा दुसरा हातही कोणाच्यातरी हातात असतोच. आणि त्याचा आधार त्याला वाचवतो. आपल्याला वाटत त्याने स्वताहून आपला हात पकडावा, त्याला वाटत आपण नुसता हात पुढे तरी करावा.. पण ह्यातलं काहीच होत नाही. तो शरीराने अजूनही आपल्या समोरच असतो. कदाचित त्याचा हातही आपल्याच हातात असतो. पण मनाने तो आपल्यापासून कायमचा दूर जातो. कधीच जवळ न येण्यासाठी. केवळ मदतीचा हात पुढे न केल्याने. पहिलं पाऊल आपणहून न उचलल्याने..
          असे प्रसंग प्रत्येकासोबत कमी-अधिक प्रमाणात घडतात. त्यांना आपणही विसरू शकत नाही. पण भविष्यात होणाऱ्या अशा प्रसंगांना रोखण्याची ताकद नियतीने आपल्याच हातांना दिलीये. म्हणून त्यांना त्यांच्या ताकदीनिशी वापरणं हेच आपलं काम..
          नियतीने बोलाविल्याशिवाय माणूस जेव्हा आपल्या हातातून निसटतो तेव्हा त्याचा शल्य आयुष्यभर बोचत राहत. आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांचं परिघ जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याचा जास्त त्रास होतो. कारण निसटलेल्या माणसांची त्रिज्या आपल्या केंद्रबिंदूपासून खूपच कमी असते. म्हणून परिघही मोठ्ठं असावं. कारण चुकून एखादा निसटलाच तरी आधार देणारे खूप असतात आणि त्या पोकळीची तीव्रताही तेवढी नसते जेवढी ती छोट्या परिघात असते.
       
         माणसाला माणूस प्रत्येक ठिकाणी लागतो. आनंदात तो साजरा करण्यासाठी, दुःखात आधारासाठी, मनातलं सगळं बोलण्यासाठी, एकमेकांसोबत जगण्यासाठी, कधी हसण्यासाठी तर कधी रडण्यासाठी.. तो लागतोच. आणि तरीही आपण त्याच्या मागे धावण्याच्या ऐवजी भौतिक सुखाच्या मागे धावतो. पैश्याच्या मागे धावतो. सगळा दम हा दाम कमविण्यातच संपवतो. कितीही धन असेल तरीही मन शांत करायला माणूसच लागतो. माणसं नसतील तर माणूसच रिता होतो. निर्जीव वस्तूंमधे आपण कितीही झाले तरी रिते मन रमवूच शकत नाही. त्याला रमविण्यासाठी सजीवताच हवी. त्यातल्या त्यात हलणारी, बोलणारी, हसवणारी, त्याला फुलवणारी..
        म्हणून आजच्या काळाची गरज झालीये आपल्याच आयुष्यातील माणसांच्या संवर्धनाची. नव्या माणसांना जोडण्याची. त्यांना कलात्मकतेने टिकविण्याची आणि आपला परिघ आपणहून वाढविण्याची..
अनुवांशिकतेने 'माणसं जोडण्याचं' बीज प्रत्येकातच असतं. आज फक्त गरज आहे त्या बीजाला वटवृक्ष करण्याची..  

             - मकरंद  

                              ©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: