मी स्नानाला जाण्याचा तयारीत होतो. तेवढयात माझं लक्ष स्वयंपाकघरात लावलेल्या White Board कडे गेलं. आज तो रिकामाच होता. रोजचं पंचांग आणि दिनविशेष लिहिण्याचा हा Modern फळा.. घराला शोभणारा.. आई-बाबांनी जाणूनबुजून लावलेल्या चांगल्या सवयीमधली ही एक.. घरात असणाऱ्या सगळ्यात लहानाकडे त्यावरचा मजकूर रोजच्या रोज लिहिण्याचं काम.. ठरलेलं.. अलिखित नियमच जणू.. अनेकांमधला एक..
मी घरी असताना ते काम माझंच असतं. म्हणून आजच्या दिवसाची तिथी पाहण्यासाठी मी कालनिर्णय गाठलं. ती होती.. मार्गशीर्ष कृ. ९, १६ डिसेंबर, मंगळवार.. मार्गशीर्ष कृ. ९ आणि मंगळवार सोडला तर १६ डिसेंबर ही तारीख मला एकदम Click झाली. माझ मन मलाच म्हणालं, " अबे मक्या, १६ डिसेंबर.. अद्वैतचा वाढदिवस.." हो.. खरंच.. आज त्याचा वाढदिवस.. १३ वर्ष पूर्ण झाले त्याला..
ते अद्वैत.. आमचं घर..
आजही मला ह्या घरातील पहिली सकाळ आठवतीये. मी उठल्या उठल्या आईला विचारलं होत, अर्धवट झोपेतच.. "आई, मावशी कुठेय..?" आणि आई मला कुशीत घेऊन म्हणाली होती आपण मावशीकडे नाही आपल्या नवीन घरात आलोय. स्वतःच्या..
त्या 'स्वतःच्या' या एका शब्दात कितीतरी सामर्थ्य दडलं होत. समाधान देणारं ते सामर्थ्य.. एका शब्दामधे सुद्धा माणसाला समाधान देण्याची किती ताकद असते ह्याच स्पष्टीकरण मला आज ते सगळे संदर्भ आठवताना कळत होत. स्नान-संध्या, पुजा, जेवण ह्या वर्तमानामधल्या क्रिया करता करता मी गेल्या १३ वर्षाच्या या 'अद्वैताच्या' भूतकाळात वावरत होतो. माझ्या खेळण्यामधल्या छोट्या गाड्यांना खडबडीत फरशीवरून मऊ फरशीवर चालवता येतंय आणि त्या सूरर..सुरर पळतायत हे बघून मला किती आनंद होत होता. ते पत्त्यांच घर आता खाली-वर नसणाऱ्या, एकाच रेषेतील फरश्यांवर किती छान उभं राहिल याच्या कल्पनेनेच किती खुश होतो मी.. छोट्या गोष्टीतही किती आनंद अनुभवायचो आपण त्यावेळी.. किती साध्या अपेक्षा असायच्या आपल्या.. माझ्या बालपणातील त्या अपुर्णांकी अपेक्षांना पूर्णांकी रूप देण्याचं काम किती सहजतेने त्या अद्वैताने पहिल्याच भेटीत केल होत. म्हणूनच मी त्याच्या प्रेमात पडलो होतो.
पहिल्या दिवसापासून ते ……….
२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर चालू झालेल ह्याच बांधकाम म्हणजे एक निराळाच अनुभव होता. पै पै साठवुन, स्वतःचा घाम गाळून, गरज पडली तेव्हा स्वतः काम करून त्या दोघांनी ह्याला स्वतःच्या लेकरासारखं वाढवलं. आमच्यासहित त्याच्या जडणघडणीमधे संस्कार त्याच्यावरही झाले. किंबहुना त्याने ते स्वतः आत्मसात केले. त्यांच्याकडे पाहून.. ते दोघे म्हणजे.. आई-बाबा.. चार भिंतीच्या या घराला खरं घरपण देणारं जोडपं..
वरिष्ठांमधल्या वरिष्ठापासुन ते कनिष्ठांपर्यंत सगळ्यांना स्वतःच मन मोकळं करण्यासाठी ह्याचीच बैठक सापडली. अर्थात त्या बैठकीला सजवणाऱ्या या दोघांचीही तितकीच महत्वपूर्ण भूमिका त्यात असायची आणि अजूनही असतेच.. "भिंतींना कान असतात" हा शब्दप्रयोग ह्या घरात कोणी तिसऱ्यानेही वापरला असेल अस मला वाटतही नाही. इतकी मोकळीकता त्याच्या बैठकीने ह्या लोकांना दिली.
स्वतःच्या वैयक्तिक गरजा न भागवता आधी 'ह्याला' परिपूर्ण करण्यात आनंद मानणाऱ्या या दोघांच्या स्वभावामुळे प्रत्येक वर्षी नावीन्यपूर्ण आणणारी एक तरी नवीन गोष्ट ह्याच्यासोबत घडायची. त्यामुळे दरवेळेस नवीन घरात राहिला आल्यासारखं वाटायचं. गेल्या १३ वर्षात ह्याचं नाविन्यपण तसूभरही कमी झाल नाही. उलट ते वाढतंच गेलं...
प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी एक महत्वाचा आधार असतं ते हे अद्वैतच.. त्याच्या मधे आल की मन शांत होतचं. जणू काही त्या मनाची समजुत ह्यानेच काढलीये. आपल्यामध्ये सामावलेल्या प्रत्येक गोष्टीत सजीवतेचा भास करून देणं ह्या निर्जीव घराला कसं जमत असेल ना..? येणाऱ्या प्रत्येक माणसाशी जुळलेली त्याची नाळ त्या माणसाला पुन्हा पुन्हा त्याच्याकडे कशी खेचून आणते हे एक नवलच आहे. आईच्या शिस्तीत, बाबांच्या नीटनेटकेपणामधे आणि दिदिच्या मुक्तछंद स्वभावामधे फुललेल्या या अद्वैताने मात्र त्याचा एक हात माझ्या डोक्यावरून कधीच हटु दिला नाही. पहिल्या दिवसापासून माझी अन् त्याची जमलेली गट्टी केवळ आम्हा दोघांनाच माहितीये.
लोक घरात मौल्यवान वस्तू ठेवल्याने त्याला एकटं सोडत नाहीत. इथे हे घरच मौल्यवान असल्याने त्याला एकटं सोडावसं वाटत नाही. गेल्या १३ वर्षात क्वचित प्रसंग सोडले तर ते कधीच एकटं राहिल नाही. किंबहुना त्याला एकटं सोडलही नाही. त्याच्या सोबत जुळलेली आमची ही नाळ म्हणूनच आम्हाला त्याच्यापासुन दूर ठेवत नाही.. अन् त्याच्यापासून दूर जाताना हळवं केल्याशिवाय सोडतही नाही. दिदिच्या लग्नात सगळ्यात पहिले सजलेलं अद्वैतच होत अन् तिला निरोप देणारं पहिलही अद्वैतच.. एकमेकांच्या मिठीत लग्नाआधीच धाय मोकलुन रडणाऱ्या त्या दोघांना आठवलं तर आजही डोळ्यांमधले आसवे थांबण्याचं नाव घेत नाहीत. ते प्रेम वेगळंच असतं हो.. खुपचं वेगळं… असो..
वेगवेगळे बिंदू असणारे आई-बाबा लग्नाच्या एका सरळ रेषेने गुंफले गेले. दिदिच्या जन्माने त्याला त्रिकोणी आनंदात परावर्तीत केलं. त्या अर्धवट वाटणाऱ्या त्रिकोणी कुटुंबाला चौकोनाचं पुर्णत्व देणारा ठरला तो माझा जन्म. वेगवेगळ्या रूपातील आम्हा सगळ्यांना एकरूप ठेवण्यासाठी कोणाचीतरी गरज होतीच. अन् म्हणुनच अद्वैताचा जन्म झाला. केवळ त्या एकरुपतेसाठी.. आमच्यामधल्या अद्वैतासाठी...
तो दिवस..
१६ डिसेंबर २००१ ते…………
- मकरंद
©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा