असे अनेक क्षण येतात आयुष्यात ज्या क्षणाला माणूस मनातल्या भावनांना पुर्णपणे मोकळी वाट करुन देऊ शकत नाही. त्या भावनांचा मनात चाललेला खेळ तो कोणालाही सांगु शकत नाही. स्त्री असो वा पुरुष दु:ख आणि सुख सगळ्यांनाच असतं. ते व्यक्त करण्याचे मार्ग फक्त वेगळे.
दिदिच्या लग्नाची CD पाहत असताना ती सासरी जातानाचा तो क्षण लागला होता. आई-बाबांनी खूप छान लग्न करून दिलं होत. सगळ्यांच्या सहकार्याने, साक्षीने अन् आशीर्वादाने. पण तिला सोडताना अश्रू आवरण त्यांनाही कठीण झालं. काय आलं असेल त्यांच्या मनात..? एका लेकीला जन्माला घालण्यापासुन ते स्वतःच्या पायावर उभे करेपर्यंत सगळ-सगळ करतात हे आई-वडील. स्वतःच्या नावालाही तिच्यापासुन दूर करण्याची ही आपली परंपरा. न मोडणारी.. का हे असं..?
काही काही प्रश्न उत्तरे न घेताचं जन्माला येतात. हा त्यातलाच एक असावा.
त्यादिवशी पहिल्यांदा भावनांचा खेळ न कळताही माझ्या छोट्याशा मनाला उमगला होता. मुलांच्या आयुष्याची एक नवी सुरवात करण्याची वेळ कदाचितच येऊ शकते. पण मुलींसाठी मात्र ती काळ्या दगडावरची रेघ आहे. आई सारखं म्हणत असते "तुम्हां मुलांना हे नाही कळायचं." कदाचित ते बरोबरच आहे असं वाटायला लागलंय आता. प्रत्येक परिस्थितीमध्ये तिच्या त्या आठवणाऱ्या सुसंगत अशा वाक्यांमुळे मला त्या परिस्थितीकडे आगळ्या-वेगळ्या नजरेने पाहण्याची दिशा मिळतीये. तिचा तो अनुभव माझ्या अनुनभवी मनाला त्याच्यासारखं बनविण्याचा प्रयत्न करतोय. तिच्याही नकळत.
प्रत्येक परिस्थितीत...
'सासरी असल्यावर माहेरची ओढ आणि माहेरी दोन-तीन दिवस राहिल्यावर लगेच नवऱ्याकडे परतण्याची आस' ही त्या नववधूच्या मनाची स्थिती..मी जवळून पाहिलेली. नव्या माणसांत स्वतःच्या मुळ स्वभावाला घालावी लागणारी मुरड, दिवसभरातील घटनांची माहेरील घटनांशी मनातच केलेली तुलना, इतके दिवस जवळ असलेल्या अन् भौगोलिक अंतराने दुरावलेल्या व्यक्तींचं क्षणाक्षणाला पटणार महत्व, त्यांची जाणवणारी उणीव, ह्या नव्या जगाच्या नव्या अग्नीपरीक्षेतून जाण्याचा योग कदाचित मुलांच्या नशिबात कधीच येत नाही.
नव्या सुरवातीचं एक कुतूहल मनात असतं, दुसऱ्यांना आपलसं करण्याचं कर्तव्य पार पाडायचं असतं, कधी जिंकण तिच्या भाग्यात असतं तर कधी जाणुनबुजून हारही तिलाच पत्करावी लागते. दगडाला छन्नी आणि हातोडयाचे घाव सोसल्यावरचं देवपण येतं. तिचंही तसचं असेल कदाचित. परिस्थितीकडून मिळणाऱ्या धड्यातून ती शिकते. परिस्थितीच तिला घडवते. क्षणाक्षणाला परिस्थिती आणि अनुभवातून पडणाऱ्या पैलुतून तिच्यातला हिरा चमकत जातो आणि कालांतराने पूर्णत्व आलेल्या त्या हिऱ्यामुळे पूर्ण कुटुंब उजळून निघत. हिरा असते ती स्त्री. मग ती कोणाची आई असेल,कोणाची बहिण असेल किंवा कोणाची बायको असेल. त्या हिऱ्यालाही पारखण्याची दृष्टी लागते. जी सगळ्यांजवळ नसते. ती असायलाही भाग्य लागतं.
अनेकदा आपण ऐकलंय किंवा वाचलंय की "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो."
पैलू पाडून तयार झालेल्या हिऱ्याच्या झगमगाटी प्रकाशात आपल्याला पहिल्यांदा तो प्रकाशच दिसतो. कौतुक त्या प्रकाशाच होत. पण कुतूहलाने पाहिल्यानंतर कळतं की त्या प्रकाशामागे हिऱ्याचा हात आहे. पुढे जाणारा, सगळ्यांना दिसणारा तो प्रकाश म्हणजे पुरुष..ज्याच्या पाठिंब्यानिशी तो पुढे जात असतो, फैलावत असतो तो हिरा म्हणजे त्याच्यामागे खंबीरपणे उभी असलेली, त्याला साथ देणारी स्त्री..
'घरातील स्त्री शिकलेली असली तर ते पुर्ण घर स्वतःच्या पायावर उभं राहतं' हे मी कधीतरी, कुठेतरी ऐकलं होत. आज त्याचं महत्व पटतंय. असे अनेक कुटुंब मी मला कळतं असल्यापासुन पाहिलेत ज्यांचा संसार पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळला होता पण त्या घरातील स्त्रीने न डगमगता स्वतः तो उभा केला होता. पुन्हा कधीही न कोसळण्यासाठी..
आपल्यासाठी झटणाऱ्या, आपल्या सुखात तिचं स्वतःच सुख मानणाऱ्या, न थकता, न थांबता सतत काही ना काही छोटे-मोठे उद्योग करत असणाऱ्या आणि आपल्या आयुष्याच्या गाडीला एका जबाबदारीने चालविणाऱ्या आपल्या आईला, बहिणीला किंवा बायकोला कधीतरी बाजुच्या सीटवर बसुन जीवनाकडे पाहण्याची इच्छा असते. त्यांनाही एक ब्रेक हवा असतो स्वतःमधे एक नवा जोश आणण्यासाठी, रोजच्या Routine मधुन काहीतरी वेगळं अनुभवण्यासाठी..
सोन्यालाही काही वर्षांनी एक काळसरपणा येतो. त्यालाही उजळावचं लागतं. ह्याचं आयुष्यापण सोन्यासारखच आहे. त्याला पण गरज असते उजळण्याची, आस असते एका नावीन्याची..त्या सोन्यात लपलेल्या हिऱ्यालासुद्धा एक नाविन्य येत त्या उजळण्याने...
अश्या ह्या आपल्या आईच्या, बहिणीच्या किंवा बायकोच्या सोन्यासारख्या आयुष्याला उजळण्यासाठी त्यांच्या रोजच्या Routine मधुन तुम्ही त्यांना एक ब्रेक देणार...?
मग बघा त्यांच्यामधला हिरा कसा लखलखाट करत चमकतो. तुम्हीच त्यांना दिलेल्या एका छोट्या अन् आवश्यक अश्या "ब्रेक के बाद..."
- मकरंद
©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा