रविवार, २० एप्रिल, २०१४

सफर एका गावाची...

                                   सफर एका गावाची...




          मारुती…एक मजेदार माणूस…दिदिचं लग्न ठरण्यापुर्वी ती रोज सकाळी उठून तिच्या M.D. चा अभ्यास करत बसायची…रोज रोज तिला अभ्यास करताना पाहून तो एके दिवशी तिला गमतीने म्हणाला "काय व्ह ताई,लगीन-बिगीन करायचं न्हाई का..? उग आपलं उठ-सुठ अभ्यास करत बसतीयात…"
त्याच्या ह्या वाक्यावर आम्ही सगळेच हसलो..तो हि हसला..काहीसा लाजला..आणि निघून गेला..
असा हा मारुती..आमचा वरप्या..दुधवाला...!!
          एखादी गोष्ट त्याच्या मनात बसली कि ती तो करायचाच..वेळ लागो पण मागे लागून स्वतःचा हट्ट पुरवून घ्यायचा..स्वतःच..माझ्या आणि त्याच्या स्वभावात मला दिसलेले हे साम्य. दिदिचं लग्न झालं. तीच झाल कि ४-८ दिवसात त्याचही जमलं. एके दिवशी त्याने आईला सांगितल की "मुलगी बघाया चाललाव,आशीर्वाद द्या." आणि आईसमोर साक्षात लोटांगण घालून आशीर्वाद घेतला पट्ठ्याने. दुसऱ्या दिवशी सकाळी आला ते थेट लग्न करूनच...मुलगी पाहायला गेला आणि लग्नच करून आला. त्या दिवशी त्याच्या ह्या बातमीने आमच्या आश्चर्याला पारावाच उरला नव्हता आणि हसण्याला तर गतीरोधकच सापडत नव्हता. असा हा मारुती म्हणजे एक अजबच प्रकार.
" त्या मारुतीने " घडवलेला…. 
             दिदि लग्नानंतर खास मतदानासाठी घरी आलेली. आल्या आल्याच दिवशी तीच आणि ह्या साहेबांच त्याच्या घरी त्याच्या बायकोच्या हातचं जेवायला जाण्याची Deal झाली..नकार देण कठीण होत.त्याचा स्वभाव पाहिला तर.  दिदिसोबत आई जाणार होती आणि आईसोबत तिच्या लाडक्या पोरीचा करवलाही जाणार होता. करवला म्हणजे अर्थातच मी. दिदिने आणि मी त्याला जेवणाचा मेनू सांगून ठेवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाण्याचा आमचा Plan ठरला... 
            ठरल्यादिवशी आम्ही त्याच्या गावाकडे निघालो. लातूरपासून ७-८ किमी अंतरावर त्याच छोटस वस्ती असलेल गाव. दिवेलागणीची वेळ झाली होती.सूर्य केव्हाच मावळून गेला होता आणि आकाशान स्वतःच तांबूस रंगाच पांघरून धरणीमातेच्या अंगावर घातलं होत. थकले भागलेले गावकरी शेतावरून परत येताना दिसत होते.एखाद्या निसर्गचित्रामधल्या चित्रासारख ते दृश्य होत. घराघरातून थापत असलेल्या भाकऱ्यांचा मंद आवाज आणि वास येत होता. आजपर्यंत त्या वासाने जिभेला फक्त पाणीच सुटत होत. मारुतीच्या घरच्या Dinner च्या आमंत्रणामुळे ते आज चाखायलाही मिळणार होत... 
           घराचं प्रवेशद्वार म्हणजे चार वितींची जागा होती. ज्याच्या अर्ध्या जागेत नुकतच जन्मलेलं म्हशीचं वासरू पहुडलेलं होत. रस्ता आणि घर हे वेगळे नव्हतेच. फक्त घरात प्रवेशाची ती जागा म्हणून त्याच नामकरण प्रवेशद्वार.चार वितींच...
          आत गेल्या गेल्या आमच स्वागत केल ते म्हशींनी. होय म्हशींनीच. एक नव्हे,दोन नव्हे,चक्क दहा म्हशींनी.. Strange ना..? मी तिथे म्हशींच्या समोरच्या बाजावर बसलो. प्रत्येक खोलीत एक ४ Watt चा CFL जळत होता..क्षणभरासाठी मला CFL च्या Marketing Team ची कमाल वाटली. असो...
त्याच्या मंद प्रकाशात ते सगळे राहायचे. Hall,Kitchen,Storeroom धरून पाच खोल्या. ५०*२० च्या त्या बांधकामामध्ये अर्ध घर म्हशींच होत तर अर्ध घर मारुतीच्या कुटुंबीयांच. बोलण्याच्या ओघात घरातल्या माणसांची संख्या मला कळाली आणि मी थक्कच. जेवढ्या म्हशी तेवढीच माणसं. बापरे.…!!!
मी आपला म्हशींच्या डोळ्यात डोळे घालून काही दिसतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करत होतो. मला काय कराव हे सुचत नव्हत. म्हशींच्या डोळ्यात तरी किती वेळ पहावं आणि का..?
          पण या निरीक्षणातून मलाच थोडस जाणवून गेल.प्रत्येक म्हैस एकमेकींपेक्षा वेगळी होती. प्रत्येकीची रवंथ करण्याची पद्धत वेगळी होती.प्रत्येकीच्या शिंगाचे आकार निराळे  होते. प्रत्येकीची ठेवण वेगळी होती.. प्रत्येकीचे डोळे वेगळच काहीतरी सांगत होते. मला न कळणार..कधी न पाहिलेलं...
          " दादा..पाणी.." या हाकेनिशी मी म्हशींच्या साम्राज्यातून वास्तवात आलो. पाण्यावरून सुरु झाली पाण्याची चर्चा. रोज ४० घागरी पाणी त्यांना आणावं लागत असे. नगरपालिकेच्या बोरवरून. 2 किमी लांब. 
" बापरे..!'' माझी पुन्हा एकदा तीच Reaction...
         आज जगात राहतोय आपण आणि ह्या गाववाल्यांसाठी त्याचं गावच ही त्यांची दुनिया आहे. आजच हे जग इतकं पुढे चाललंय पण त्यांच्या साध्या अन्न,पाणी,निवारा ह्या गरजाच ते पूर्ण करण्यात गढून गेलेत. एखाद्या अर्धवट बांधकामाच्या चार भिंतींच्या नुसत्या विटाच्या घरावर पत्रे टाकून राहावे अशी त्यांची घरे..इतके वर्ष झाले आपल्या स्वातंत्र्याला आणि तरीही ही परीस्थिती अजुनही का..? ह्यात चूक कोणाची..?
असे एक ना अनेक प्रश्नांची जत्राच डोक्यात भरली होती. निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणांमधील ऐकलेली दयनीय अवस्था आज उघड्या डोळ्यांनी पाहिली. माझ्याच शेजारच्या गावात.. पण ते लोक खुश होते. आहे त्यामध्ये समाधानी दिसत होते. मोठं त्यांनाही व्हायचं होत पण त्यामधे हाव नव्हती,स्वार्थ नव्हता...
अशातच एक वाक्य वाचलं होत...
                      " LOVE THE LIFE YOU LIVE...LIVE THE LIFE YOU LOVE." 
 आज ते अनुभवण्याचा योग आला. मारुतीच्यारुपाने.... 
           मारुती होता भोळा पण त्याची जिद्द शिकण्यासारखी होती. आम्हाला जेवणात काही कमी पडू नये म्हणून जेवताना स्वतः उठणारा, आम्हाला बघता याव म्हणून म्हशींची धार काढून दाखवणारा,रात्री दहाला आम्हाला सोडवायला येणारा हा मारुती खरच एक अजबच प्राणी होता..त्याच्याकडे व्यवहारज्ञान नव्हत पण त्याच्याही दुपटीनं माणुसकी होती..त्याच्या भाषेला धार नव्हती पण प्रेमाचं वळण होत..कधी,कुठे,काय करायचं ह्याची जाण नव्हती पण ही जाण असलेल्यांची मदत घेण्याची बुद्धी होती...
          अश्या ह्या मारुती आणि त्याच्या घरच्यांच्या पाहुणचाराने आमची मने तृप्त झाली. त्याच्या बायकोने केलेल्या झणझणीत भाज्या, खमंग धपाटे, भाकऱ्या, गरम पोळ्या आणि आंबुस दह्याने पोटातल्या कावळ्यांना शांत केले...परतीच्या वाटेवर असताना, आकाशाच्या दाट गर्द छायेत,गाडीच्या मिणमिणत्या प्रकाशात एक विचार मनाला स्पर्शून गेला.
        "  शनिवारचा दिवस हा....मारूतीच दर्शन झालं...देव्हाऱ्यात नव्हे प्रत्यक्षात......!!! "


                                   - मकरंद

                                                                                              ©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: