बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

शब्द - तुमच्या आमच्या मनांमधले.. ...

               खरंच खूप मजेदार आहे आपलं आयुष्य.. किती जणांनी किती काही लिहिलय त्याच्यावर.. स्वतःच्याच  अनुभवातून, बघण्यातून, ऐकण्यातून, समजण्यातून वगैरे वगैरे.. पण तरीही त्याच्यावर लिहिता येतच राव.. कधीही, कुठेही आणि कितीही..
               मी Diary लिहित होतो. किंबहुना अजूनही लिहितोच आहे. फक्त विषय भरकटला आणि त्याच्यासोबत मीही. अशा भरकटण्याची आता सवयच झालीये. अन्  भरकटलेले हे अनोळखी रस्तेच मला पुन्हा ओळखीच्या वळणावर आणून ठेवतायत. जणू काही त्यांना कळतय की मला कुठे जायच आहे ते..
               कधी कधी वाटून जात की खरच असा सरळ, Problems रहित, काळजीविरहित, एकदम मोकळा रस्ता माणसाच्या आयुष्यात नसतो का..? हे झालं की ते, ते झालं की हे, मग ह्यातलं काहीतरी अर्धवटच राहिलेलं असतं, त्यातलं काहीतरी मधेच डोकं वर काढत.. हे सतत चालूच.. आपलं संपल की दुसऱ्यांच आणि त्यांच संपल की पुन्हा आपलं.. हे अविरतच.. दिवसभरात आपल्याला एकट न सोडणारे 'हे' आणि 'ते' त्यांच्या जोडीदारांसहित स्वप्नातही कुठल्या रस्त्याने येतात देवच जाणे..
               मला चांगल आठवतय १०वी मध्ये असताना कोणीतरी म्हणलेलं  की हा आयुष्याचा  Turning Point आहे. १२वी ला ही पुन्हा तेच. नंतरही तेच.. आज मागे वळून बघितल्यावर कळतय की ''अरेच्चा.. ह्या Turning Points ची संख्या तर वरचेवर वाढतच जात आहे." आणि नंतर लक्षात आलं की शालेय जीवनानंतर घेतलेल्या एका वळणाने मात्र या रस्त्याला नागमोडी चालीची सवयच लावली. जणू काही Turning Points हे त्याचे अविभाज्य घटकच आहेत. कधी नको वाटणारे Turning Points अचानक पुढ्यात उभे राहतात. त्यामुळे मन चलबिचल होत, अस्वस्थ होत.. तर कधी जे Turning Points यावेसे वाटतात तेही लांबणीवर पडत जातात.. कदाचित कधीच न दिसण्यासाठी.. ??  मग पुन्हा मन चलबिचल होत, अस्वस्थ होत.. ह्या प्रत्येक भावनेत शब्द एकच असले तरी ती भावना मात्र वेगळीच असते. एकातून वाट शोधायची असते तर दुसऱ्यात शोधलेल्या वाटेवर चालण्यासाठीसुद्धा वाट पहावी लागते.. किती अजब आहे ना हे.. असो..
                 माणूस हा स्वार्थी प्राणी आहे ह्यात तसूभरही शंका नाही. कदाचित स्वतःच्या आनंदी भवितव्यासाठी तो जवळच्या लोकांच्या मनाशी खेळण्यास मागे-पुढे पाहणारही नाही. दिवसभर उपवासाने उपाशी असणाऱ्या व्यक्तीला पुढ्यात पंचपक्वान्नाच ताट दिसत तेव्हा त्याच्या मनात उपवासासंबंधी चालणारे मनाचे खेळ आणि 'त्या' माणसाच्या मनात जवळच्या लोकांच्या संदर्भात चालणारे मनाचे खेळ हे कदाचित सारखेच असावेत.. पण जो स्वतःच्या आनंदी भवितव्यासाठी जवळच्या लोकांरहित जगण्याऐवजी त्यांच्या सहित जगण्याचा प्रयत्न करतो तो लाखात एक असा लाखमोलाचा माणूस असतो. असा एक तरी आपल्या सोबत असावाच. आणि आपणही कोणासाठी तरी असं होण्याचा प्रयत्न करावाच.. हो ना..? असो..
                 Problems कोणाला नसतात.. ती चुकणाऱ्यातील गोष्टच नाही. ते आठवणीने आपल्याकडे येणारच. ठराविक अंतराने. जसा सकाळचा Mobile चा Alarm Snooze केल्यावर ठराविक अंतराने वाजत राहतो तसच ह्यांच आहे. त्यालातरी कायमच बंद करता येत. ह्यांच्यावर तसा प्रयत्न केला तर ते अजूनच जास्त संख्येने येतात. पण प्रत्येकाचे Problems वेगळे.. प्रत्येकाला वाटत की माझाच Problem सगळ्यात मोठा.. मग कधी कोणी भेटलं की त्याच्याशी Share करून ते मनमोकळे होतात. किती छान असत अशा लोकांच.. ज्यांच्यासमोर मोकळ होता येत त्यांच्यासमोर मोकळे तरी होतात. अन् काही असतात.. मनातील गोष्टी मनातच ठेवणारे.. ह्याला बोलू की त्याला बोलू च्या संभ्रमात अडकणारे.. कोणाचीतरी वाट पाहणारे.. ती वाट पाहणं, संभ्रमात अडकणं चांगल नसतं हे माहिती असूनही तसंच करणारे.. असो..
                  मागच्या वर्षभरात चुकून खूपच पुस्तके वाचल्या गेली. त्यामुळे आयुष्य कसं असतं आणि कसं जगावं हे Theorotically अनेकांच्या लेखनशैलीतून अनुभवता आलं. "आसान है, Be Positive, You are what you think, You are the creature of your own life" असे अनेक विचार अन् दृष्टीकोन ती पुस्तके वाचताना समोर होती. कितीही Problems आले तरी त्याला Enjoy करा असं म्हणणारे वाक्य वाचताना छान वाटत असली तरी Practically त्यांच्यामधला मतीतार्थ परिस्थितीनेच कळायचा. ह्या सगळ्या थोर लेखकांच्या दृष्टीने आपल्या आयुष्याकडे बघितले तरी आपले Problems हे संपणारे मुळीच नाहीयेत. त्याला हवा तो आपलाच दृष्टीकोन. या सगळ्यांच्या मदतीने तयार झालेला.. स्वतःचा असा..
PERFECTLY MATCH ONLY FOR OUR LIFE.. हो ना..?        
                 
                आज बरेच दिवसानंतर लिहीणं झालं.. लिहिता लिहिताच विषय भरकटला म्हणून.. वैयक्तिकातून सार्वजनिकाची सुरुवात कशी झाली ते मलाही उमगलं नाही.. पण लिहिलं की लिहिल्या जात हेच खरं.. म्हणूनच शब्दांच्या ह्या ओळींना विशिष्ट असं शीर्षक काय द्याव हे मलाही सुचत नाही. कारण हे तर साधेच शब्द.. तुमच्या-आमच्या मनांमधले.. 
बरोबर ना..?                  


                       - मकरंद

                                                      ©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: