गुरुवार, १९ मार्च, २०१५

INTENTION




               दोन तीन दिवसांपासून मी विचारात होतो.. एका विषयाच्या.. INTENTION.. त्याच्यावर लिहिता येत का हा प्रयोग मलाच माझ्यावर करायचा होता. मला वाटत होत ह्या एका शब्दावर काय लिहिणार..? पण कधी वाटायच खूप लिहिता येण्यासारख आहे या एका शब्दावर.. Article लिहिल्यानंतर  शीर्षकाचा शोध घेणारा मी प्रथमच शीर्षकावरून Article चा शोध घेतोय. अनेक प्रसंग,संदर्भ, अनुभव दिमतीला असुनही मला सुरुवात कशी करायची हे कोड सुटत नाहीये. "लिहलं की लिहिल्या जात" हे माझच वाक्य मला आधार देतय. कळत पण वळत नाही अशी परिस्थिती अनेकदा येते पण आज ना धड कळेना व नीट वळेनाही..
मग हे लिहिण्यामागच INTENTION काय.. ?
मी अनुत्तरीतच.
               आपल्या ह्या रोजच्या आयुष्यात पावलोपावली स्वतःच्या अस्तित्वाची हे  INTENTION जाणीव करून देत असतं. त्याच्याकडे Intentionally बघितल्यावरच कदाचित आपल्याला हे कळू शकत. 'ते' चुकल तर आपल्यामध्ये 'महाभारत' घडविण्याची ताकद त्याची नक्कीच आहे. वपु म्हणायचेच की "महाभारत हे नात्यांमधेच घडतं'' कदाचित त्यांच्या ह्या वाक्याच्या मागचा संदर्भ INTENTION च असू शकेल. कारण बहुतांश वेळी माणसामाणसामधे घडणाऱ्या रामायण-महाभारतात महत्वाची भूमिका ही ह्या INTENTION चीच असते.
               समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना योग्य शब्दांत पोहचवता येणं यासारख सुख नाही आणि भावना चांगली असूनही ती त्याच्यापर्यंत योग्य INTENTION ने न पोहचण यासारखी वाईट गोष्ट दुसरी कुठलीही नाही. कारण योग्य INTENTION ने पोहोचणारी भावना जेवढा आनंद आपल्याला देते त्याहूनही अधिक शल्य चुकीच्या INTENTION मुळे भेटतं. मग मनातील भावना कितीही पवित्र, शुद्ध, सरळ असेल तरीही तिला विरुद्धार्थी बनविण्याचं सामर्थ्य ह्याच्याकडे कुठून आल असणारे देवच जाणे..
परंतु दरवेळेस योग्यच INTENTION ने समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोहचण किंवा त्यानेही योग्यच INTENTION ने त्या घेणं, थोडक्यात इतकं Ideal राहणं म्हणजे ' विराट कोहली कडून प्रत्येक सामन्यात शतकाची अपेक्षा करण्यासारखंच झालं  नव्हे का..?' तो ही कधीतरी शून्यावर बाद होतोच. आणि आपल्यासारख्या सामान्यांसाठी तर अशा बाबतीत शून्यावर बाद होण्याचीच वेळ अनेकदा येत असते..
हो ना..?  असो..
              सभोवताली मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत की ज्यांची मैत्री, नातं, प्रेम केवळ योग्य भावना, योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य शब्दात न पोहचल्याने बिघडलेली आहेत. कधी त्यात चूक ती भावना योग्य शब्दात, योग्य वेळेत पोहचविणाऱ्याची जशी असते तशीच कधी चूक ती भावना योग्य प्रकारे कळून घेता  न आल्याने समोरच्याचीही असते. म्हणूनच हे INTENTION जितक्या वेळेला नातं घडवतं तितक्याच वेळेला ते नातं बिघडवतही. मग ह्या घडण्या-बिघडण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी मार्ग असेलच अस मला बऱ्याचदा वाटून गेल. पण 'योग्य' शब्दाच्या मागे धावणाऱ्या मला तो योग्य मार्ग काही केल्या मिळत नव्हता . त्या घडण्याला बिघडण्यापासून रोखणारा.. आणि आज अचानक 'तो' गवसला.. अनाहूतपणे.. माझ्याही नकळत..
           
            चांगल नात घडविण्याच काम आपण जेव्हा चांगल्या INTENTION ने करत असतो तेव्हाच या नात्यामध्ये नुकत्याच जन्मलेल्या विश्वासाची वाढ होत असते. जेव्हा विश्वासाचही वय वाढू लागत तेव्हा त्याला आपल्यातील अहंकाराची सोबत मिळू लागते. नात्यामध्ये वावरताना आपलं चांगल INTENTION जितक महत्वाच असत तितकच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाच आपल्यातील अहंकारापासून त्या नात्याला योग्य वेळी वाचवण हे ही आपल्याच हातात असतं. Modern भाषेतील हा Ego Problem त्या नात्याच्या वयाच्या वाढीनुसार आपणही अनुभवतो. ही काळ्या दगडावरची रेघ पुसली तरी पुसल्या जाणार नाही इतकी सत्य आहे यात कोणाचही दुमत नसेल. किमान एकांतात मान्य करताना तरीही.. 
            एखाद्या गोष्टीकडे केवळ आपल्याच दृष्टीकोनातून पाहणारे आपण जेव्हा त्याच गोष्टीला समोरच्याच्या डोळ्यातून पाहतो तेव्हा कधी कधी आपल्यालाच आपल्या विचार करण्याच्या पद्धतीची शरम वाटायला लागते. पण तिथेही 'आपला ती गोष्ट पाहण्याचा दृष्टीकोन चुकला' हे मान्य करण्याची हिम्मत बहुतांश वेळी तो अहंकार आपल्याकडून हिरावून घेतो. हे ही तितकच खर..
             आयुष्य जगताना ह्या चुका प्रत्येकाकडून होतात. पण तरीही अशा अनेक चुकांमधून शिकूनही आपल्याकडून त्या चुका पुन्हा पुन्हा का घडतात ह्याच उत्तर माझ्या आजच्या वयाला शोधूनही सापडल नाही. परंतु प्रत्येक प्रश्नाच उत्तर मिळावच अस नाही ना..?  कारण उत्तर न मिळणे हे सुद्धा अनेकदा उत्तरच असतं. ह्या अजाणत्या वयाला जाणतेपणा येण्याचीच ही खूण नव्हे का.. ?

             नातं बिघडत केंव्हा..? जेव्हा वादाच्या भीतीने माणूस संवाद करायचा थांबतो. मनात चालणारा संवाद जेव्हा ओठांवर येण्यासाठी धडपडतो तेव्हा.. कारण नात्यामध्ये निर्माण होणाऱ्या बहुतेक समस्या ह्या कोणी 'काय म्हटलं' ह्यापेक्षा ते 'कसं म्हटलं' यामुळेच निर्माण होतात. 'काय म्हटलं' हे बुद्धीला कळत, 'कसं म्हटलं' हे मनाला लागतं. म्हणूनच त्या मनातील संवादाला एका ठराविक काळानंतर जेव्हा सुसंवादाची साथ मिळत असते तेव्हा ती घेऊन मनाला मोकळ करणं आपल्यासाठी आणि सभोवतालच्या परिस्थितीसाठी केव्हाही उचितच ठरतं. कारण त्या सुसंवादाने आपल्यामुळेच दुखावलेल्या समोरच्याच्या मनावर एक फुंकर मारल्या जाते किंवा कधी आपल्याही मनावर समोरच्याकडून नकळत अशीच फुंकर मारल्या जाते..
प्रेमाची.. विश्वासची.. अन् आपुलकीची..
            सतत आपल्या सोबत असणाऱ्या Smart Phone मधे  Junk Files वाढू नये म्हणून त्याला वेळोवेळी Clean  करणारे आपण ह्या  निसर्गतःच लाभलेल्या आपल्या Smart मनातील Junk Files Clean करण्यासाठी का विसरतो..? इतक्या Virtual जगात Reality चा आनंद शोधणारी ही Virtual Reality आपल्यामधे कोठून आली..? त्या Junk Files मुळे hang होणारा आपला Phone आपल्याला दिसतो मग त्या संवादाअभावी hang होणारं आपलं मनच आपल्या दृष्टीच्या पलीकडे कसं जात..? इतके दृष्टिहीन कधीपासून झालो आपण..?
अयोग्य INTENTION च्या भीतीपोटी योग्य INTENTION ही न पोहचवण हे तर खेळता येत असूनही हरण्याच्या भीतीने न खेळण असंच झाल नाही का..?  आणि म्हणूनच ह्या सगळ्यामध्ये त्या अहंकाराच पारड कुठे न कुठे इंचभर तरी जड ठरत. तो जर नसला असता तर हे प्रश्नच उद्भवले नसते. म्हणूनच चांगल्या INTENTION ने फुलवलेल्या नात्याला जेव्हा आपण आपल्याच अहंकारापासून जपतो तेव्हा ते नातं अजूनच बहरत. विश्वासू बनत. आपल्या चांगल्या INTENTION ने फुललेल्या नात्याला बहरलेल बघण्यासाठी आपल्याच So Called EGO ला शाबूत ठेवणं आणि तो न राहिल्यास एका ठराविक काळानंतर सुसंवादाची सुरवात आपणहून करणं ह्यातच आपली खरी कसोटी नव्हे का..? 
 
            Intentionally लिहिण्यासाठी सुरवात केलेल्या ह्या INTENTION च्या शीर्षकात मधेच  So Called EGO ची  Entry झाली आणि अनेक प्रश्नांची उत्तरे लिहिता लिहिताच मिळून गेली. सुरवात आणि शेवट कशी करायची ह्याच्या कोड्यामधे अडकलेला मी आता मात्र काही प्रमाणात तरी सुटलो अस म्हणायला काही हरकत नाही.. हो ना..?



                       - मकरंद 



                                             ©makarand92.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: