बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

शेवट अन् सुरुवात...

             असाच बसलो होतो. कानात Earphones अडकवलेले होते. मी एकटा असताना ते माझी साथ कधीच नाही सोडत. आजही त्यांनी ती सोडली नाही. एकच गाणं चालु होत. मागच्या एक-दोन तासांपासून.. Repeat Mode वर.. प्रकाश बाबा आमटे चित्रपटामधलं ते गाणं. "तू बुद्धि दे..तू तेज दे..नवचेतना..विश्वास दे.." ते गाणं इतका वेळ होऊनही बदलाव वाटत नव्हतं किंबहुना त्याच्या तोडीच गाणं माझ्याकडे नव्हतं.. तेवढ्यात माझं लक्ष भिंतीवर असणाऱ्या 'कालनिर्णय' कडे गेलं. नजरेचं, विचारांच आणि गाण्याचं Cocktail माझ्यासाठी नव नव्हतंच.. पण नजर स्थिरावली.. त्या कालनिर्णयवर.. त्याच्या 31 डिसेंबर वर.. आजच्या दिवसावर..
             गाण्याचा प्रत्येक शब्द आता काहीतरी वेगळच खुणावू लागला.. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कालनिर्णयाच्या मागच्या 12 पानांमधील 364 दिवसांमधे सापडण्याचा अवखळ प्रयत्न ती नजर विचारांच्या साथीने करू लागली. तो प्रत्येक शब्द मला गेल्या वर्षभरात घडलेली एकेक  घटना आठवून देत होता. त्याला अनुसरुन असलेली.. त्या घटनेमधील मला, मीच त्रयस्थ होउन पाहत होतो. एखादी चांगली गोष्ट दिसली की मनात हळूच एक आनंदाची उकळी फूटायची. स्वतःचाच अभिमान वाटायचा. पण जेव्हा मी चुकलेलो आठवलो की कसतरीचं व्ह्ययचं.. मन स्वतःलाच सांगायचं 'अरे मक्या, किती साधी गोष्ट होती ती, अशी कशी चुकलास तू..? Next time be careful हा..' त्याच्या या कधी खडसावुन आणि कधी प्रेमाने धीर देण्याच्या सवयीमुळे जरासं हायसं वाटायच. ते मला कधीच सोडणार नाही आणि त्याने सोडल तर मीच राहणार नाही असं काहीसं मला वाटून गेलं..  कोणत्याही परिस्थितीमधे ते मला चुकीचा सल्ला देणार नाही ह्याची पुन्हा एकदा मला खात्री पटली आणि फक्त त्याच हे खडसावणं आणि प्रेमानं धीर देणं कळण्याची बुद्धि हवी याची जाणीवही झाली..
          कितीतरी गोष्टी मला त्या कालनिर्णयाच्या बारा पानांमधे दिसल्या.. त्याच्या प्रत्येक पानावर माझी वेगळीच आकृती मला दिसत होती. पण त्याहीपेक्षा माझ्यासोबत त्या पानांवर असणाऱ्या दुसऱ्या आकृत्याच माझं लक्ष स्वतःकडे आकर्षित करत होत्या. पहिल्या पानावरचा त्यांचा चेहरा पाचव्या-सहाव्या पानावर किती वेगळा दिसत होता. स्वतःच काम झाल्यावर त्या किती सहजतेने माझ्यापासून लांब गेल्या. कदाचित माझ्या अजाणतेपणात त्यांना जाणतेपणा दिसला असावा.
पण ह्या सगळ्यांमधे काही आकृत्या होत्या.. प्रत्येक पानावर..माझ्यासोबत.. स्वतःची ठेवण बदलली तरी मन न बदललेल्या ह्या आकृत्या.. त्यांना मी काय म्हणू..? Thank You हा शब्द खुपच तोडका वाटतो त्यांच्यासाठी.. पण तुमच्या आणि माझ्या आकृत्यांच्या मध्यबिंदुना जोडून ठेवणाऱ्या रेषेला अखंड ठेवण्याचं काम मी नक्की करेन.. अगदी शेवटपर्यंत..
           या सरत्या वर्षात एक खूप जवळचा मित्र मला मिळाला. विश्वासार्ह असा.. तो म्हणजे पुस्तकं.. खूप काही शिकवल त्यांनी.. अनुभव आणि पुस्तकं यांच्यासारख्या गुरु शोधुनही सापडणार नाही असं मला प्रकर्षाने जाणवलं.
'मृत्युंजयाच्या' 72 तासाने सहनशीलतेचा अविष्कार माझ्यासमोर ठेवला. 'युगंधराच्या' पारायणाने बुद्धीची अन् विचाराची क्षमता दाखवून दिली. 'प्रतिसादाच्या' रूपाने आध्यात्माचं, हनुमानचं एक वेगळच रूप माझ्यासमोर आलं.. आयुष्यातील कठोरता 'स्वामी' ने दाखवून दिली. चेतन भगतच्या 'Half Girlfriend' ने सातत्याच महत्व सहज भाषेतून अन् नेहमीच्या विषयाच्या धाटणीतून पटवून दिल. आणि वपुंनी...??
वपुंनी तर जीवनाला आकार देण्याचं काम केवळ शब्दांतून करून दाखवलं.. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष जीवन जगायला शिकवल. या कालनिर्णयामधील पोकळ दिवस या सगळ्यांमुळे भरीव झाले. आणि म्हणूनच ते माझ्या जवळचे बनले.. त्यांच्या पुस्तकीरूपानेच...
         आनंदाच्या गोष्टीसोबत या 12 पानांमधे काही दु:खद घटनाही घडल्या..हसत-खेळत स्वभावाच्या, मला नकळत अनेक गोष्टी शिकवणाऱ्या, थोड्याश्याच सहवासात स्वतःच्या स्वभावाने मला आपलसं करून टाकणाऱ्या काही वडीलधाऱ्या माणसांच्या पुढच्या प्रेमाला मी कायमचाच मुकलो. त्यांच्या मिळणाऱ्या प्रत्यक्ष आशीर्वादाला मला आता
अप्रत्यक्षपणे अनुभवावं लागतय.. असो..
नसणाऱ्या माणसाच्या आठवणींमधे रमताना कसतरीच होत. ह्या 'कसतरीची' व्याख्या करताना मीही धड़पडतो.
म्हणूनच हा 'असोचा' आधार...
            त्या आधारानिशी मी या सगळ्या तंद्रीतुन बाहेर आलो.. आणि आता फक्त 31 तारीखच दिसू लागली.. एक वर्ष पुन्हा संपल.. खूप काही नवीन शिकायला भेटलं.. माझ्यातील एक वेगळच रूप माझ्यासहित अनेकांना पाहायला मिळालं.. स्वतःमधले असे रूपं पाहायला कोणाला आवडणार नाही..? मला तर नक्की आवडेल.. स्वतःला उलगडायला.. स्वतःला ओळखायला..अन् नावीन्याला अनुभवायला..
माझ्याजवळच पुढच्या वर्षाचं 'कालनिर्णय' ठेवलं होतं..त्याचा पहिला दिवस मला खूणावत होता.. येणाऱ्या अनेक नव्या क्षणांसाठी मन आतूर होत.. नव्या अनुभवांसाठी ते सज्ज होतं.. एका कालनिर्णयाच्या शेवटाने दुसऱ्याची सुरवात होत होती.. मनाला सहज एक विचार स्पर्शुन गेला की,"काय मागवं या नव्या वर्षाकडे स्वतःसाठी..??"
अन् तेवढ्यात कानात गाण्याचे शब्द घुमले..
"तू बुद्धी दे.. तू तेज दे.. नवचेतना.. विश्वास दे..."
           

                       - मकरंद

                                         ©makarand92.blogspot.com

                          
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: