अनपेक्षितपणे कोसळणारा मुसळधार पाऊस, पहुडलेल्या शरीराला अचानक जाणवणारा थंडावा, दारातून येणारी आणि हवीहवीशी वाटणारी थंडगार झुळुक, झोपेच्या अधीन झालेल्या मला हे सगळं जाणवत होत. ते सुख असचं मिळत राहावं असं क्षणभर वाटलं. तेवढ्यात आईचा जोरात आवाज...
" मकरंद, मोटर भिजतीये, तिच्यावर झाक..." कासव सश्याच्या लहानपणीच्या गोष्टीत अर्ध्या शर्यतीनंतर झोपेतून उठलेल्या सश्याची जशी अवस्था असेल तशी माझी होती. मी अंगातल बळ एकवटून, पळत जाऊन मोटरवर झाकलं. त्या सश्याला हरण्याचं दु:ख असेल कदाचित. पण मी ती मोटर भिजण्याआधी त्यावर झाकल्याचा एक आनंद होता. जिंकल्यानंतर जसा असतो अगदी तसाच. मी जसा काही खूप मोठा तीर मारलाय अश्या तोऱ्यात परतत होतो.मुसळधार पावसात, त्याच्या टपोऱ्या थेंबांना अंगावर खेळवत, स्वतःला जाणतेपणाने भिजवत, एका अजाणत्या आनंदात..
पहिल्या पावसाच्या...
पहिल्या पावसाच्या...
पहिल्या पावसाला खूप जण या ना त्या प्रकारे मानतात. काहींच्या आठवणी तर फक्त 'पहिल्याच' पावसाच्या असतात. नंतरचे पाऊस ह्यांना कसे काय आठवत नाहीत हे न सुटलेलं कोडंच म्हणावं लागेल. माझ्यादृष्टीने.. पण खरचं असतो, पहिला पाऊस हा पहिलाच असतो. ऊन्हाळ्याच्या त्या नकोशा वाटणाऱ्या वातावरणात पावसाची एखादी सर जरी पडून गेली तरी कसं 'मस्त' वाटतं. त्या 'मस्त' ची व्याख्या प्रत्येकासाठीच निराळी..त्याच्या मनाने तयार केलेली..त्याला आवडणारी..त्यालाच साजेशी अशी...
आजचाही दिवस तसाच होता. दिवसभर ऊन की ऊन होत. घराबाहेर पाय काढावासा वाटत नव्हता. पोटासाठी अन् पोरांसाठी रस्ता दुरुस्तीच काम करणाऱ्या समोरच्या माणसांची मला दया येत होती. मला घरात बसून ऊन नकोसं वाटत होत आणि ते लोक तेच ऊन सोसत होते. कधी कधी वाटून जात की अशा लोकांना देवाने बुद्धी दिली नसेल का..? मन उत्तर द्यायचं, 'बुद्धी असतेच फक्त ती वापरण्याची कला त्यांच्याकडे नसते. जी कला कधी प्राप्त होते शिक्षणातून, कधी संस्कारातून, तर कधी परिस्थितीतून..कमी ही कलेची असते बुद्धीची नव्हे..'
"ज्याची बुद्धी वापरण्याची कला उत्तम तो बनत जातो सर्वोत्तम.."
उदाहरणांची कमी आपल्यासमोर कधीच नसते. सभोवताली असे अनेक उदाहरणे दिसतील. फक्त इथेही हवी ती दृष्टी..त्यांना सापडण्याची, बघण्याची आणि जाणून घेण्याची...असो..
अचानक आलेल्या त्या पावसाने वातावरणाचा नुरच पालटला. " श्रावणमासी हर्ष मानसी...." ही परिक्षेत आठवणीने न आठवणारी चारोळी मला इथे प्रत्येक शब्दानिशी न चुकता आठवली. सातवी मध्ये असताना वाचलेली, वाचलेली नव्हे पाठच केलेली ती चारोळी मला आत्ता सात वर्षांनंतर जशीच्या तशी आठवली. माझं मन स्वतःकडे बघून निराळ्याच नजरेने हसलं आणि मलाही ते माझचं माझ्यावरचं हसणं आवडलं.
श्रावणातल्या पावसाची सर येईल अश्या ह्या पावसाची सुरुवात वैशाखातच झाली होती. तो अवकाळी होता पण वाटत नव्हता.. 'अवकाळी' हे नाव पावसाला ज्या कोणत्या महाशयांनी दिलं असणारे ते स्वतःच कदाचित तसे असतील. नसत्या चाली-रुढींची परंपरा चालू ठेवण्याची ही आपली जुनीच सवय..
मला नव्याने उमगलेली..
पण नुर खरोखरच पालटला होता. माणसांचा, वातावरणाचा, झाडाझुडपांचा, प्राण्यांचा अन् पक्ष्यांचा...थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक सजीव वस्तुला नवा जीव प्राप्त झाला होता आणि निर्जीव वस्तुत सजीवतेचा भास होत होता. तिटकारा वाटणारं ते कॉंग्रेसगवत सुद्धा त्या पावसाच्या सरीने कमळाप्रमाणे फुललेल्या सभोवतालच्या परिस्थितीत एकरूप झालं होत. मला त्याचा आज हेवा वाटला. स्वःत्व सोडुन कमळाने फुललेल्या वातावरणात विलीन होण्याची बुद्धी त्या छोट्याश्या कॉंग्रेसच्या गवतालाही झाली.
खऱ्या कॉंग्रेसची वेळ अजून यायचीये...
पावसालाही कदाचित मोदींची आठवण आली असेल. तो वातावरणावर स्वतःच अधिपत्य गाजवत होता. आणि परिस्थिती पालटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. अगदी हुबेहूब त्यांच्यासारखाच..असो...
घराघरातून लोक बाहेर पडत होते. पक्षांनी घरटी सोडली होती. मातीचा तो दरवळणारा सुगंध फक्त मनातच साठवता येत होता. त्याची लहरच हटके होती. प्रसन्नता दिसत होती..प्रत्येक वस्तुमधे.. गच्चीवरून वाहणाऱ्या पाण्यातुन पाण्याचा प्रश्न सोडवणारे, त्या पाण्याचा सदुपयोग करणारे लोक दिसत होते. माझं कुतूहल वाढतच होत..नजरेच्या प्रत्येक फेकीला...क्षणाक्षणाला...
कागद आणि पेन झटक्यानिशी माझ्या जवळ आले होते. त्यांना न बोलावताही..चांगल्या मित्रत्वाची जणू काही ते साक्षच देतायत. त्या दोघांशी जमलेली गट्टीच हे सगळं लिहित होती. आत्ता तर सुरवात झाली होती त्या पावसाची अन् मला चाहुल लागली होती लिहिण्याची..अजून बऱ्याच अनुभवांची गाठ पडायचीये..त्या अनुभवांना अविस्मरणीय बनवायचय, त्यांच्यात मला रमायचय, त्यांच्यासहित मला जगायचय..आणि आठवणींच्या त्या मनातील कप्प्याला मला अमर्याद स्वरूप द्यायचय...
त्या मुसळधार पावसाची सुरुवात एका छोट्या टपोऱ्या थेंबाने झाली होती. जशी त्याची तशीच माझीही..तो भिजवत होता आणि मी भिजत होतो. तो वातावरणाला आल्हाददायक बनवत होता आणि मी त्या वातावरणाचा आनंद घेत होतो...चिंब होऊन...त्याच्या आगमनानेच परिस्थिती बदलली होती..
सभोवतालचीही आणि मनातलीही...
आपली मरगळ झटकून टाकणाऱ्या त्या पावसाचाही स्वतःचाच एक वेगळेपणा असतो. तो स्वतःही आनंदी असतो दुसऱ्यांच्या आनंदात.. तो स्वतःही रडतो दुसऱ्यांच्या दु:खात.. दुसऱ्यांना आधार देणं हे त्याचं काम..मग ते दु:ख असो वा सुख ते तो निभावतोच...बिनदिक्कतपणे..
आज एक दृष्टीकोन मिळाला त्या पावसाकडूनही शिकण्याचा..अनुभवही मिळाला ते बघण्याचा..आणि एक दिशाही मिळाली माझ्याचं जीवनाकडे एका वेगळ्या तऱ्हेने बघण्याची.. थांबण्याआधी त्या पावसाने एक बीज माझ्यात पेरलं आणि तो निघुन गेला.. तात्पुरताच सही..
ते बीज होत....
ते बीज होत....
" त्या मुसळधार पावसातील एक छोटासा थेंब बनण्याचं.."
मी प्रयत्न चालू केलाय त्या बीजाला वटवृक्ष बनविण्याचा...
तुमचं काय..??
- मकरंद
©makarand92.blogspot.com
©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा