रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

शाळा..




      


         मनात कधी कधी खरचं काय चालत आणि कसं चालत हेच कळत नाही. चमत्कारी कृतींच घरच आहे आपल मन म्हणजे..
अचानक मला शाळा आठवली, वर्ग आठवले,
त्यांचे नंबर आठवले, माझे Roll No.आठवले, विषय आठवले, त्यांना शिकविणारे शिक्षक आठवले, परीक्षा आठवल्या अन् सरतेशेवटी परीक्षेत लिहिलेले निबंध आठवले आणि वाटल आत्ता निबंध लिहिला तर..?
विचारांच्या Highway वरून धावणाऱ्या मनाच्या
सुसाट गाडीला मधेच कुठेतरी एक Sideway लागतो. एका विशिष्ट ठिकाणी घेउन जाणारा..आज माझ्या मनाने त्या शाळेतील परीक्षेत लिहिलेल्या निबंधाच्या Sideway ला पकडल..आणि ते धावू लागलं..सुसाट वेगाने..
पुन्हा एकदा..त्या निबंधाच्या वाटेवर..
         मला वाटुन गेलं खरचं जर निबंध लिहिला तर तो आधीपेक्षा चांगला असेल ना..? मार्कांच्या शर्यतीत नसणारा अन् स्वानुभावावर लिहिला जाणारा हा निबंध खरच जर कोणी तपासला तर तो त्यांच्या मनाला भावेल..?
त्यांना आवडेल..?
          हे सगळं अनाहुतपणे घडत होत. पहाटेच्या चार वाजता..केवळ एका विचारामुळे..
तो विचार..निबंधाचा अन् माझ्या शाळेचा..
अर्ध जग साखर झोपेच्या कुशीत झोपलं होत अन् मी शाळेच्या आठवणींना त्यांच्याच कुशीत अलगद बिलगल्या जात होतो..
माझ्याही नकळत..
मनातल्या 'त्या' आठवणींने भरलेल्या या घड्याला
उतु जाण्यासाठी सुद्धा हीच वेळ मिळाली होती..पण मीही त्या घड्याला आज उतु जाण्यापासुन रोखलं नाही..कारण आठवणीच तशा होत्या..हव्याहव्याशा वाटणाऱ्या.. एका वेगळ्याच विश्वात घेउन जाणाऱ्या.. अन् उतु गेल्या तरीही न संपणाऱ्या..
शाळा..
        आयुष्याच्या पुस्तकाची बहुतेकांची सुरवात याच पानाने झालेली असते. अनेक अनुभवांनी भरलेली, एकेका घटनांच्या पक्क्या धाग्याने जोडलेली ती पाने त्या पुस्तकात अनिवार्यच असल्यासारखी असतात. त्यांच वेगळच महत्व असत. आयुष्यभर पुरतील असे नाना   त-हेचे बीज या वास्तुतून, तिच्या आत घडलेल्या घटनांतुन आणि आलेल्या अनुभवातून आपल्यामधे पेरले जातात. प्रत्येकामधे त्यातील एका वेगळ्याच बीजाचा वटवृक्ष होतो. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांपेक्षा वेगळा ठरत जातो. आपापलं अस्तित्व घडत जातो. स्वतंत्र बनत जातो. त्याच्याही नकळत पेरल्या गेलेल्या केवळ त्या बीजामुळे..ते बीज पेरणारी ती आपली शाळा..
         शाळेतील 'त्या' आठवणींना शब्दात पकडणं प्रयत्न करूनही मला जमत नव्हत. फुलावरच फुलपाखरू जसं हातात आलं की निसटुन जात तश्याच ह्या आठवणी हातात आल्या की निसटत होत्या..दुसऱ्याच फुलावर जाऊन बसत होत्या..नव्या आठवणी आठवत होत्या..शब्दात व्यक्त करता न येणाऱ्या..
          ते वर्ग, असणारे मित्र, हव्याशा वाटणाऱ्या पण तेव्हा न भेटलेल्या मैत्रीणी, ते बेंचेस, त्यावर ठरलेल्या जागा, ते Sir-Madam, त्यांची ठेवलेली टोपणनावे, वर्गातली ती भांडणे, तासांमधे गुपचुप मारलेले Jokes, हसुन- हसुन दुखलेल पोट, एकमेकांचा केलेला पचका, Interval मधली रोजचीच डबा पार्टी, आपला सोडुन दुसऱ्याचाच डबा खावासा वाटणारी ती प्रत्येकाचीच मनस्थिती, तिला योग्य न्याय देणारे माझ्यासारखेच काहीजण, तेव्हाही स्वतःत अडकलेले मित्र, वर्गात सगळ्यांसमोर खाल्लेली रागावणे, सरांचा तो मार, आपापल्या बेंचवरची ती वेगळीच अशी कुजबुज, आपल्या तिच्याकडे टाकलेली चोरटी नजर, त्या नजरेला पकडणारी तिची नजर अन् एकमेकांच्या नजरानजरेने खाली गेलेली दोघांचीही नजर..
अहाहा..!!
काय Cocktail असायच ते.. एक वेगळच Thrill..पुन्हा कधीच न भेटणारं..
      वाढणाऱ्या वयासोबत त्या अजाणत्या वयालाही जाण येऊ लागते. विचार न करता बेधडक कृती करणारे आपण हळुहळु त्यांच्या परिणामांचा विचार करुनच कृती करू लागतो अन् कधीकधी केवळ त्या बेधडक वृत्तीने मिळणाऱ्या गोष्टीही हरवून बसतो..कायमच्याच..
शाळेतील त्या बेधडकपणाला आपणही आता कधीतरी वापराव ना..? त्या गोष्टींना हरवण्यापेक्षा..?
त्यांच्यापासून दुर जाण्यापेक्षा..?
कधीतरीच..
असो..
     शाळेत असताना पुढच्या आयुष्याचे किती वेध लागायचे आणि आता त्या पुढच्या आयुष्यात आलोयत तर शाळेचे वेध लागतातच.. मधेच कधीतरी..
काळ-वेळ विसरून..
     त्या शाळेच महत्व तिच्यापासून दूर जाताना खुप जाणवलं. तो क्षणच होता तसा..आम्हाला Send Off देण्याचा..त्या प्रांगणात बसुन शाळेच्या वास्तुकड़े नजरेचा एकेक कटाक्ष जात होता. प्रत्येक ठिकाणी उभा असणारा एक वेगळाच मी मला दिसत होतो. दरवेळेेस बदलता..वाढणारा..त्या शाळेच्या कुशीतला..एक वेगळाच मी..
पाण्याने डबडबलेल्या त्या डोळ्यांना दुसऱ्याच्या नजरेपासुन लपवणं या ५-६ वर्षात नक्कीच शिकवल होत तिने.. पण ते मन मात्र मुक्तपणे रडत होत..त्याच्या अदृश्य पणाचा पुरेपुर उपभोग घेत..तिच्याच कुशीत..तिच्याच आठवणीत..
शेवटचं..
      येताना सुरवंटासारखं असणाऱ्या आपल्याला जाताना मात्र एक मुक्तछंद फुलपाखरू बनवल होत ह्या शाळेने..
       एका नव्या जगात प्रवेश करण्याआधी, त्या जगाला तोंड देण्यासाठी आपल्याला परिपुर्ण बनवलं होत ह्या शाळेने..
        काहींशी जन्मभराच नातं जुळवलं तर काहींच्या मनाशी आपल्यालाच एकरूप केलं ते ह्याच शाळेने..
         नव्या जगात बागडण्यासाठी जाणाऱ्या, आजतागायत विविध क्षेत्रात केलेल्या अन् भविष्यात स्वतःच नाव करणाऱ्या अनेकांना संस्कराचे बाळकडु दिले ते ह्याच शाळेने..
         अन् सरतेशेवटी स्वतःच्या मायेने वाढवलेल्या तिच्या असंख्य मुलांना त्यांच्या उत्कार्षासाठी स्वतःपासुन दुर सारलं तेही ह्याच शाळेने..
          तिच्या आठवणीत रमणाऱ्या आपल्यासारखचं आपल्याही आठवणीत ती कधीतरी रमत असेल..कधीतरी तिलाही तिच्या मोठ्या झालेल्या लहान लेकरांना पुन्हा भेटावस वाटत असेल.. पण ती निश्चल असते..स्थिर असते..तिच्या अविरत चालणाऱ्या कार्यासाठी..
ते कार्य..
देशाच्या उद्याच्या भावितव्याला घडविण्याच..
त्यांना संस्कराचे बाळकडु देण्याचं अन् स्वतः झिजुन दुसऱ्यांना जगविण्याच..
      म्हणूनच आज वाटलं की जाऊया पुन्हा त्या शाळेत..? आपल्यासाठी नव्हे तर तिच्यासाठी..?
तीच ती..एकमेव अशी..
श्री. देशिकेंद्र विद्यालय,लातूर..
               
                    - मकरंद

                                                                                                     ©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: