बुधवार, ८ जुलै, २०१५

खिचॅक..


          काहीतरी वेगळचं नाव दिसतंय ना..? मलाही असचं वाटल होत. शेक्सपिअर म्हणालाच होता ''नावात काय असत..?" पण ह्या वाक्याखाली स्वतःच नाव लिहिण्यास मात्र तो विसरला नाही. म्हणजेच नावात नक्कीच काहीतरी असणार.. जश्या त्याच्या तश्याच ह्या Article च्या..
        पावसाळा सुरु होऊन महिना होत आला. हवा तेवढा पाऊस जरी झाला नसला तरी निसर्गाला हिरव्यागार सानिध्यामधे खुलविण्यासाठी तो हवा तेवढा नक्कीच बरसला आहे. माझ्यासारख्या निसर्गप्रेमींना आजपर्यंत त्याची एक सर घराबाहेर काढण्यासाठी नक्कीच पुरेशी ठरलीये. म्हणूनच की काय गेल्या दोन आठवड्यांमधे याच निसर्गाने अनेकांसहित मलाही स्वतःत सामावून घेतलं.
        एका बाजूला उंचच उंच खडकाळ डोंगर, त्याचे हत्तीच्या सुळ्यासारखे बाहेर आलेले दगड, त्याच विशाल डोंगराच छत असणारा छोटा रस्ता, त्या रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या आणि बाजूला असणारी हिरवीगार खोल दरी...  असं दृश्य मी लहानपणापासून Computer च्या  Desktop वर असणाऱ्या Wallpapers मधेच पाहिलेलं.. आणि प्रत्यक्षात असे दृश्य पाहायला आपल्याला Foreign Countries मधेच जाव लागणार असा असलेला निव्वळ भ्रम त्या 'माळशेज' घाटाच्या भेटीने साफ चुकीचा ठरवला. घाटामध्ये कोसळलेल्या दरडीमुळे बंद झालेला रस्ता पूर्ववत करण्याचा आटोकाट प्रयत्न अनेक माणसे क्रेन, ट्रक यांच्या सहाय्याने करत होते. धुवांधार कोसळणाऱ्या पावसाची, स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता.. आणि आपण..  आपण किती सहजतेने कुठल्याही सरकारवर टिका करून मोकळे होतो. म्हणूनच की काय बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून उत्तर देण्याचा प्रयत्न हे सरकार करत असावं असं काहीसं वेगळच मला त्या क्षणभरात वाटून गेलं.
असो..
          कमळगडावरचाही अनुभव असाच काहीसा होता. "शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप" या उक्तीची प्रत्येक पावलागणिक 'तो' गड जाणीव करून देत होता. Practically महाराजांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या व्यूहरचना, डावपेच किती सक्षम असायचे हे त्यांच्या कुठल्याही गडाला दिलेल्या भेटीत तात्काळ दिसून येत. ४००० फूट उंचीवर असणाऱ्या त्या बालेकिल्ल्यावरील ३०० फूट खोलीच्या कावेच्या विहिरीत उतरल्यावर तर आश्चर्याला सीमाच नव्हती. कुतूहलापोटी चाखलेली त्या कावेची चव तोंडात बोट घालायला लावणारी होती आणि म्हणूनच आयुष्यात पहिल्यांदाच रात्रीतून चढून सर केलेला तो गड 'कमळासारखाच' सगळ्याहून वेगळा ठरला.
         या सगळ्या गोष्टीचा आणि शीर्षकाचा अजूनतरी काहीच संबंध नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सतत सोबत असणारा, त्यांना अविस्मरणीय बनवणारा, अनेक आठवणींना पुनरुजीवीत करणारा 'तो' म्हणजे सगळ्यांचाच लाडका ''कॅमेरा" आणि त्याचाच तो आवाज.. खिचॅक.. 
         गेल्या १० वर्षाच्या काळात या कॅमेऱ्याने एखाद्या गोष्टीमध्ये Development ला किती वाव असू शकतो हे दाखवून दिलय. आणि म्हणूनच त्याच्यामधील प्रत्येक Development ने आपल्यालाही Wow म्हणायला भाग पाडलय. माणसाच्या आयुष्यात घडणारे प्रत्येक क्षण त्याच्या स्मृतीत राहतातच असे नाही. काळानुरूप विस्मृतीच्या पावलावर पाऊल ठेवून ते कधी निघून जातात ते आपल्यालाही कळत नाही. विस्मृती ही निसर्गाने माणसाला दिलेली एक देणगीच नव्हे का..? ती नसती तर आठवणींमधे रमणारा माणूस आज पाहायलाच मिळाला नसता. आणि आठवणीच नसत्या तर त्यांना साठवून ठेवणारा हा कॅमेरा…… .
   
        माझ्या जन्माच्या पहिल्या दिवशी मी कसा होतो हे मला जितक्या सहजतेने तो दाखवू शकत नसायचा तितक्याच सहजतेने आज जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला तो हवाहवासा वाटतो. जन्मापासूनच लागलेली त्याची सवय या भूमातेपासून दूर जातानाही सुटत नाही ही त्याची खासियतच म्हणायची. आपल्या आयुष्यातील असंख्य चांगल्या-वाईट क्षणांना त्याने स्वतःच्या विशाल अशा उदरात सामावून घेतलंय.. ह्याच चांगल्या क्षणातून आनंद, प्रेरणा देणारा हा कॅमेरा अन् त्याचे Photos मात्र वाईट घटनेमधुन आपल्या मधील सुधारणेला असलेला वाव आपल्याला दाखवून देतात. क्षणाक्षणाला त्याच्या फोटोत कैद होणारे आजचे आपण जेव्हा १०-२० वर्षानंतर स्वतःकडे एका वेगळ्याच नजरेने पाहु तेव्हा आपल्याच विस्मृतीत गेलेल्या आठवणींना क्षणार्धात उजाळा मिळाल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच..     
        Colleges मधील Birthdays, Lectures मधे सरांचे काढलेले Photos, Videos, एखाद्या Celebrity शी झालेली भेट, आई-वडिलांच्या लग्नाची Silver Jubilee, नुकतचं जन्मलेलं तान्हुलं बाळ, त्याच्या छोट्याश्या अन् क्षणिक अशा मनमोहक हालचाली, कधीकाळी Tension मधे असणारे आपण, एकांतात असताना स्वतःचे काढलेले वेडेवाकडे Photos, रात्री-अपरात्री मित्रांसोबत केलेला धिंगाणा, आपण पहिल्यांदाच बनविलेला एखादा पदार्थ, जुन्या मित्र-मैत्रिणींची झालेली भेट, लग्नसमारंभ, पार्टी, Famous होत जाणारे सगळ्या प्रकारचे Selfies, आपण केलेल्या निसर्गभेटी असे एक ना अनेक क्षण त्या Photos मधे साठवून ठेवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. या सगळ्या क्षणांना अमूर्त रूप देण्याचं काम हा कॅमेरा अगदी बेझिजकपणे, कोणतीही तक्रार न करता करतो आहे आणि तो सतत करतही राहिल ह्यात कुठलाही वादच नसावा...
     
          गेल्या दोन आठवड्यांमधे या सगळ्याचाच जरा जास्तच अनुभव मी घेतला.. त्या निसर्गासोबत अनुभवणारा प्रत्येक क्षण कसा माझ्या डोळ्यात आणि कॅमेऱ्यामधे साठवता येईल हे मी क्षणाक्षणाला बघत होतो. त्या निसर्गाच्या असणाऱ्या प्रत्येक फोटोत मीही असावं असा आग्रह ते Selfies Selfishly करतच होते. मग मीही त्यांना अडवलं नाही. पण एका क्षणाला तो कॅमेरा बंद पडला. किंबहुना त्याला निसर्गातील काही क्षणांना स्वतःत सामावून घेणं अशक्य होऊ लागलं. उन अन् पावसाची चालणारी शिवणापाणी, एका क्षणाला मनाला हवीहवीशी वाटणारी मंद झुळूक अन् दुसऱ्याच क्षणाला आपल्यालाही हतबल करणारा तिचाच तो बेभान वारा, समोरच्या धुक्यात जाणवणारा थंडावा या सगळ्या गोष्टींसमोर मात्र तो यंत्रवत कॅमेरा हतबल झालेला मला दिसला. मला वाटून गेल आत काय..?
            पण ह्या हतबल झालेल्या कॅमेऱ्याने दिलेल्या एका Signal ने माझ्या मनाच्या कॅमेऱ्याला Activate केलं. त्या मनाच्या कॅमेऱ्याने दृष्टीच्या सहाय्याने आपला Focus Adjust केला आणि त्या निसर्गाच्या या क्षणांना मनाच्या कप्प्यात सामावून घेणारा, त्या अनुभवांना मनात कायम साठवणारा, तो मनाच्या कॅमेऱ्याचा आवाज पुन्हा कानात घुमला..
तोच तो आवाज..
तुमच्या-आमच्या आवडीचा..

खिचॅक.. 


                         - मकरंद 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: