रविवार, २७ जुलै, २०१४

ते ७२ तास...

                ते ७२ तास...
      बरेच दिवसापुर्वी अशाच गप्पांमधे एका मित्राने विचारलं "काय मक्या कुठलं पुस्तक वाचतोय सध्या..?? " कॉलेज मधेही माझ्या वाचनाच्या खबरा पोहचतायत हे ऐकल्यावर मला उगीचच जरा भारी वाटू लागलं. क्षणभरच...
पण त्या क्षणभराचीही उसंत न घेता आणि माझ्या उत्तराची वाटही न पाहता त्याने सांगुन टाकल की "मी मृत्युंजय वाचतोय." तेवढ सांगुन तो निघुन गेला. जणू काही तो मला फक्त सांगण्यासाठीच आला होता.. पण माझ्या मनात आणि कानात एकच शब्द घुमू लागला.
मृत्युंजय..मृत्युंजय..मृत्युंजय...!!
       बरेच प्रयत्न केले तरी मला ते पुस्तक मिळत नव्हतं. आणि तो वाचत असल्याने स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्याकडून मागणं माझ्या मनाला पटतं नव्हतं. १५ एक दिवस असेच धामधुमीत निघुन गेले. कानात आणि मनात घुमलेले ते शब्द हळुहळु पुसट होत गेले. पुसटश्या आठवणींप्रमाणे.. पण काही काही आठवणी या मधेच काळ, वेळ अन् परिस्थिती न बघता उफाळुन येतात. त्यांच्या सारखचं हे नाव होत..पुस्तक होत.. मृत्युंजय.. त्यानही एका दिवशी अशीच उफाळी मारली आणि शेवटी न राहवून मी त्याच मित्राकडुन ते पुस्तक पाच दिवसांच्या मुदतीवर मागुन घेतलं. त्याच वाचन अपूर्ण असताना देखील.. कदाचित त्यालाही माझी ती ओढ़ दिसली असेल म्हणून दुसऱ्या दिवशीच त्याने मला ते आणुनही दिलं...
मृत्यंजय...
काय होत त्या नावात अन् पुस्तकात ज्याच्या वाचनाची  मला वारंवार इच्छा होत होती..?
एका शुर योध्याची कथा.. त्याचा जीवन संग्राम.. सत्य कथा.. सत्य घटना.. जगापासुन दूर राहिलेलं सत्य आणि फक्त सत्य....
त्या शुरवीर कर्णाचं..
आणि मृत्यंजयाचं पर्व सुरु झालं..
घड्याळाचा काटा जसा जसा पुढे जात होता तसे तसे पानंही पटापट पलटत होते. कर्णाचं बालपण तो स्वतःच सांगत असणाऱ्या भाषेमधे लिहिल्याने एक एक दृश्य समोर उभे राहत होते. त्याचं चंपानगरीमधील बालपण, आईच्या नकळत गंगेच्या पात्रात उतरून अर्घ्यदान करणारा तो.. हस्तिनापुरातील त्याचा पहिला दिवस..राजवाडा बघुन डोळे दिपुन गेलेला तो..आणि त्याची जन्मजात मांसल कुंडले बघुन दिपुन गेलेले वरिष्ठ आणि गुरुकुलात शिकणारे कनिष्ठ कौरव पांडव...
एकेक व्यक्तिरेखा माझ्यासमोर प्रकटत होती आणि ती स्वतःच जणू झालेल्या गोष्टी मला सांगु लागली. ४ वाजता वाचायला बसलेलो मी जेवायची वेळ झाली तरी उठलो नव्हतो. सगळे Roommates मला सोडून केव्हाचं जेवायला गेले होते. अन् मी आपला बसलो होतो सगळ्या कौरव पांडवांच्या मधे एक एक पान उलटत.. जणुकाही त्यांनीच मला धरून ठेवलयं..स्वतःच्या आयुष्यातील "त्या" घटानांशी खिळवुन ठेवलय असं...
वाचता वाचता रात्री कधीतरी मला झोप लागली. सकाळी उठून पाहतो तर काय सगळे गायब झाले होते..त्यांच्या त्यांच्या विश्वात...
मी आवरून पुन्हा बसलो. त्या सगळ्यांना पुन्हा जमविण्यासाठी..हस्तिनापुरात पुन्हा जाण्यासाठी..अन् त्या कर्णाला अजुन जवळून अनुभविण्यासाठी..
     भुतकाळातील बदलणाऱ्या प्रहरांप्रमाणेच वर्तमानातील प्रहरांचे ठोके न चुकता पडत होते. बाहेर मेघराज गर्जत होते. त्यांचा वेग वाढतच होता अन् मला त्या मृत्युंजयाचा आवेग चढत होता. अंगावरचा काटा ज्या क्षणी विरत होता त्याच्या दुसऱ्याच क्षणाला तो त्याही पेक्षा अधिक तीव्रतेने उभा टाकत होता.. रोमांचकारी अनुभवाची व्याख्या आज मी अनुभवत होतो..
त्या कर्णासहित..
    काय होत त्या कर्णामधे एवढं..?
जन्मापासूनच एका सारथ्याच्या घरात वाढलेला, त्यांनाच आपले आई-वडिल मानणारा एक निव्वळ सारथीपुत्र, सुतपुत्र होता तो..
क्षत्रियांच्या कुलात जन्म घेणाऱ्या पण आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात हे सत्य कळालेला एक अभागी होता तो..
आयुष्यभर सुतपुत्र म्हणून हिणवला गेलेला, विटंबना झालेला कौंतेय पुत्र अन् सर्वात वरिष्ठ पांडव होता तो..
दिग्विजयाचा आपला रथ एकाचवेळी आर्यव्रतात  चोफेर उधळणारा एकमेव महापराक्रमी वीर होता तो..
आपल्या दानशूरपणाने देवाधीदेव इंद्रालाही स्वतःपुढे याचक म्हणून उभे असता आपलं सर्वस्व असणारं कवच-कुंडलं विचारही न करता देणारा दानशूर कर्ण होता तो..
स्वतःच्या सख्ख्या मातेला आणि भावांना केवळ एका वचनामुळे दूर सारणारा वचनबद्ध कर्ण
होता तो...
सुर्याला आपला गुरु मानणारा, सुतपुत्र नव्हे तर प्रत्यक्ष सुर्यपुत्र होता तो...
हे सगळे गुण त्याला नकळत त्याच्या खऱ्या मातेकडुनच नाही का मिळाले...?
होय तीच ती..राजमाता कुंती.. लहानपणीची पृथा..
केवळ वडिलांच्या राजा शुरसेनांच्या वचनाला जागुन राजा कुंतीभोजची मुलगी झालेली १४ वर्षीय पृथा..
आपल्या बालपणाच्या १४ वर्षाच्या गोष्टी, स्वभाव, आपली लोकं, आपलं गाव आणि आई-वडील सोडून केवळ वडीलांनी तिच्या स्वतःच्या जन्माच्याही आधी दिलेल्या वचनाला जागणारी ती पृथा खरचं वचनबद्ध नव्हती काय..?
स्वतःच्या पोटच्या बाळाला केवळ त्याच्या कुंडलावरुन १५ वर्षानंतर ओळखणारी आणि तरीही समाजाच्या भीतीने आयुष्यभर हे सत्य स्वतःपुरतच मर्यादित ठेवणारी तीच कुंती सहनशील नव्हती काय...?
पुत्राच्या दिग्विजयी पराक्रमाने मनोमन दिपुन गेलेली पण तरीही त्याच्यासमोर उभा टाकु न शकलेली एक अभागी माता नव्हती काय..?
आयुष्याच्या वाटेवर सतत स्वतःची शारीरिक, मानसिक आणि आत्मीक कोंडी पत्करून जगणारे हे
माता-पुत्र खरचं अतुलनीय होते. ते एकत्र आले असते तर आजच्या जगाची रचनाच बदलली असती. पण सृष्टिला स्वतःच्या बोटांवर खेळवणारा एक महापुरुष त्याच काळात होता. तो ब्रम्हांडनायक, देवकीपुत्र, द्वारकाधीश..
श्रीकृष्ण...
माझं पुस्तक शेवटच्या टप्प्यात आलं होत. तिकडे कौरव पांडवांच्या महासंग्रमाने तिसऱ्या दिवसात पदार्पण केलं होत आणि इकडे मी पण माझा तिसरा दिवस सुरु केला..त्यांच्यासहित...
एका मागोमाग वीर पडत होते. कोणी जिंकत होत तर कोणी हारत होत. अन् महासंग्रमाच्या शेवटच्या टप्प्यात श्रीकृष्णाच्या मदतीने अर्जुनाने नि:शस्त्र कर्णाला पाडलं..कायमचच...
मृत्युशय्येवर असताना एक याचक त्याच्या समोर आला होता. समोरच्या याचकाला देण्यासारखं काहीच नसताना आपल्या तोंडातील सोन्याचे दात पाडून त्याने त्याला संतुष्ट केले. तो याचक परतला.
संतुष्ट मनाने.. खरचं तो याचक होता..?
की आपल्या शिष्याची मृत्युशय्येवर असताना एकमेव परीक्षा घेणारा प्रत्यक्ष सुर्यदेवच होता..?
पण त्याच्या शिष्यरुपी पुत्राने गुरुला योग्य गुरुदक्षिणा देत याही परीक्षेत अव्वल स्थान पटकावलं होत.
       त्या महान योद्ध्याच्या या कृतीने अर्जुनालाही लाजवल.. श्रीकृष्णाच्याही डोळ्यात पाणी तरळुन गेलं.. तोही कर्णाच्या दानशूरपणाने भारावून गेला. अन् तो मृत्युही त्याच्यासाठी अनेकदा हळहळला..
हाच कर्णाचा सगळ्यात मोठा विजय होता. मृत्युलाही हळवा करणारा तो वीर "मृत्युंजयी" ठरला होता..
एकमेव असा मृत्युंजयी....!!
        पुस्तक संपल होत. मागच्या ७१.३० तासांपुर्वी मी ते हातात घेतल होत आणि ४२ हुन अधिक तास ते माझ्या हातात स्थिरावल होत.
मी स्तब्ध होतो..शांत होतो..निश्चल होतो..
तेवढ्यात एक छोटासा आवाज क्षणभरासाठी आला. मी इकडे-तिकडे पाहिलं. तिथे कोणीच नव्ह्तं. डोळे मिटले आणि माझी दृष्टी माझ्याच अंतरंगात गेली. ते दृश्य पाहून मीच थक्क झालो. मिटलेल्या डोळ्याच्या कडाही पाण्याने ओलावल्या..
माझ्याच हृदयावर एक नाव कोरलं होत अन् ते स्वतःच्याच प्रचंड तेजाने धगधगत होत. ते नाव होत......
"मृत्युंजयी कर्ण...."
कोण होता तो कोराणारा...???
                              -मकरंद

                                                                                          ©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: