गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

मृत्यू..


                 भीतीदायक शब्द आहे का हा..? कदाचित अनेकांसाठी असावा. मधल्या काळात अचानक एक अनपेक्षित घटना घडली. सुदिनी.. मनाला हादरवून टाकणारी.. आणि त्याच दिवशी एक विचार मनात छोट्याश्या विषयाचं छोटस बीज पेरून गेला. त्याला हवं तसं खतपाणी अजूनतरी माझ्याकडून मिळालं नाही. पण मला त्या छोट्याश्या बीजाला मरू द्यायचं नव्हतं  म्हणूनच आज प्रयत्न करतोय त्याच्याविषयी लिहिण्याचा.. त्याला वाचविण्याचा.. त्यात नवा जीव ओतण्याचा.. अन् त्या मृत्युच्या बीजालाही जगायला भाग पाडण्याचा..
                   एवढा का घाबरत असेल माणूस ह्या 'मृत्यू' ला..? या जगात येताना आनंदाच्या सरींनी अनेकांना भिजविणारे आपण जाताना मात्र त्यांना दुःखाच्या खाईत ढकलून जातो. किती अजब आहे हे. आज आपल्यासोबत असणारा माणूस उद्या आपल्यासोबत नसेल ही कल्पनाच किती भयानक आहे आणि म्हणूनच स्वतःपेक्षाही दुसऱ्यामधेच  Involve होण्याची सवय असणारा हा माणूस त्याच्या कायमच्या जाण्याने इतका सैरभैर होत असेल. मला वाटायचं Attachment आणि Involvement ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात. पण त्या कधीच नसतात. माणूस Attach प्रत्येकाशी होऊ शकतो पण Involvement मात्र क्वचितच घडत जाते. एखाद्यासोबतची Involvement जितका आनंद, आधार, समाधान माणसाला देत असते तितकच जास्त दुःखी, निराधार त्या व्यक्तीच्या जाण्याने ती माणसाला बनवते. जसे जसे वर्ष सरत जातात तशी तशी ह्या क्वचित घडणाऱ्या घटनांची संख्या कळत-नकळत वाढत जाते. आणि एक क्षण येतो.. परीक्षेचा.. ज्यावेळी वाटत, एवढं सगळं सोडून निघून जायचं..? काहीही न घेता..? कायमचच..?
                 आणि इथेच कदाचित माणूस अडकत असावा. एका श्वासाने सुरु झालेली आपल्या आयुष्याची गाडी, इतके टक्के टोणपे खाल्ले तरी कधी बंद न पडलेली ती, आता मात्र केवळ एका उच्छवासानंतर कायमची बंद पडणार हे नियतीच गणितच बहुतांश जणांना सुटत नसावं. म्हणूनच अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तो ह्या मृत्यूला घाबरत असावा.
                  लहानपणी आपल्याला सांभाळणारे इतके असायचे की 'मृत्यू' नावाच्या शब्दाची सावली सुद्धा आपल्यावर पडत नसायची. तरुणपणी मात्र तोच मृत्यू आपल्या कृतींकडे बघून कधीकधी हसत असावा. 'जगणं काय असतं' हे तो आपल्याला ओरडून सांगत असतो पण त्याने मिठी मारल्यावरच बहुतांश वेळी ते आपल्याला का कळतं असावं ह्याच उत्तर ज्याच तोच देऊ शकतो. आपल्या या ज्ञानातील अज्ञानावरच तो मंद हास्य करत असेल. तर कधी अगदी ह्याच्या उलट परिस्थिती सुद्धा पहावयास मिळते. जगायला दिलेलं हे आयुष्य चांगल्या गोष्टींमधे खर्च केल तर त्यालाही आनंद होत असेल. मग तोही कदाचित आपल्याकडे चार जणांच्या भेटी घेऊन येईल..
असो..
                    कधी तो नुसती टिचकी मारून जातो तर कधी दरदरून घाम फुटावा इतकी भीती दाखवून जातो. कधी इतका त्रास देतो की माणसाला त्याच्या मिठीत एकदाचं कायमचं जावसं वाटावं पण तो धड घट्ट मिठीतही घेत नाही, तर कधी शांत झोपलेल्या माणसाला त्याच्याही नकळत अलगद घेऊन जातो. जणू त्याची पहाट त्याला दुसरीकडेच करायची असते. काहीही न कळवता होणारी त्याची भेटच त्याला भीतीदायक बनवत असावी. म्हणून खरंच त्याला एवढं घाबरायचं..? नाही.. तो नुसता घाबरविण्यासाठी नक्कीच आलेला नसावा. त्याचाही काहीतरी हेतू असेलचं.. कधी टिचकी मारताना तर कधी घाम फुटेपर्यंत पळता भुई थोडी करणारा त्याचा क्षणभंगुर सहवास आपल्याला त्याच्या हेतूची आठवण तर करून देत नसेल ना.. ?

                 गावाला निघालेल्या आपल्याला गाडीत बसल्यावरच एखाद्या वस्तूची आठवण होते. पण त्या मृत्युसोबत त्याच्या गावी जाताना अशा राहिलेल्या गोष्टींच्या आठवणींनीच आपला उर भरून आला तर..? त्याने मारलेल्या टिचक्या कदाचित ह्या अशा उर भरून आणणाऱ्या गोष्टींची यादी कमी करण्यासाठीच असाव्यात. आपल्यातील स्वार्थी माणसाला निस्वार्थ भावनेने जगण्याची दिलेली ती संधी तर नसेल..? कारण फक्त त्या निस्वार्थ भावनेनेच ती यादी कमी होऊ शकते. निदान त्याच्यासोबत जाताना आपल्याच जीवनाकडे एक कटाक्ष टाकला तर आपल्याला वाटलं पाहिजे,
" व्वा..!! मजा आ गया.." त्या वाक्यामधलं समाधानच आपल्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल.
                मनात राहिलेल्या 'स्वावलंबी इच्छा', एखाद्या व्यक्ती बद्दल असणाऱ्या भावना, मतभेद, वर्षानुवर्षे मनातच कुढत राहिलेलं सत्य इत्यादी गोष्टी तो आलेला असतानाच समोर येतात. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की त्याला व्यक्त होण्यासाठी निसर्गाने अनेक मार्गांची सोय करून ठेवली आहे. मग ह्या व्यक्ततेची जाणीव इतक्या उशीराचं का..? पोटी असलेलं ओठी यायला सुद्धा धैर्य लागतं. म्हणूनच अप्रत्यक्षरीत्या सांगितल्या जाणाऱ्या भावनांना कधी प्रत्यक्षाच्या वाटेवरून चालवायचं असतं अन्यथा त्या शेवटच्या क्षणी 'अरे हे करायचच राहिलं' अशी अवस्था येउन ठेपते. त्या क्षणी आपल्या हातात वेळही नसते आणि काळ तर प्रत्यक्ष समोरच उभा असतो. म्हणून जीवन जगताना मनातल्या भावनांना वेळोवेळी वाट करून दिलेली बरी.. न जाणो ती संधी तो दुसऱ्यांदा देईलच की नाही..?
                संत कबीरांनी म्हणून ठेवलय, '' कल करे सो आज कर, आज करे सो अभी. " कदाचित हे मृत्युबद्दलच असावं. आपण बोलण्या-बोलण्यातून किती सहजगत्या म्हणून जातो ' उद्या बघू.' पण त्या शेवटच्या क्षणी वर्तमान आणि भूतकाळाच्या खांद्यांवर आधार घेत जेव्हा आपली नजर भविष्याकडे जाते तेव्हा डोळ्यासमोर फक्त अंधार असतो. कारण  मृत्यूनंतर उद्या नसतोच. तोच शेवट.. चालू वर्तमानाचा, गेलेल्या भूतकाळाचा आणि कधीच न दिसणाऱ्या त्या आपल्याच भविष्याचा..
               हा न दिसणारा उद्याचा दिवसच माणसाला सर्वात जास्त भयकंपित करत असावा. कबीरांच हे सार्वत्रिक वापरलं जाणार वाक्य आज खूप वेगळा दृष्टीकोन देऊन जातंय. त्या एकाच वाक्यामध्ये अनेक प्रश्नांची खात्रीलायक उत्तरे जराश्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिल्यास अनेकांना सापडतील. एकंदरीत काय तर 'तो' येणार आहे हे नक्कीच. आपण हसत, मनमोकळं रहायचं ही त्याची अपेक्षा. त्याच्या सोबत जाताना आयुष्याच्या बाबतीत खंत कोणालाही नसावी. उलट आपणंच अभिमानाने म्हणावं...

                     " ऐ मौत, तू भी आजा एक दिन हमारे बुलाने पे.. 
                         तू रोएगी बहोत उस दिन और हम हसते हसते मर जाएंगे…!! " 


                        - मकरंद 






















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: