मंगळवार, २९ एप्रिल, २०१४

TURNING POINT...




                              






          रात्रीचे बारा-साडेबारा वाजलेले. झोपलो होतो. पण झोप येत नव्हती. डोळे जाणुनबुजून मिटले होते पण मन मात्र उधाणलेलचं होत. त्याच्या स्वतःशीच गप्पा चालू होत्या. एका विषयातून  दुसऱ्या विषयात जाण्याची त्याची कला. असंख्य प्रश्न, अगणित भावना अन् अमर्याद विचार..हा त्याचा खेळ..
रोजचाच.. न चुकणारा...
           उठलो. लाईट लावला. समोर कागद होता. पेनसाठी नजर लोहचुंबकासारखी इतस्तत: फिरली. तिच्या ताब्यात एक पेनही आला. पण अशा वेळी न चालणारेच पेन कसे हातात येतात ते मला आजपर्यंत कळालं नाही. शेवटी एकदाचा मिळाला  'तो पेन.' माझ्यासारख्यांसाठी.. 'ती पेन.' उरलेल्यांसाठी..भाषेवरून असलेला वाद आपल्याला नवा नाहीच..हो ना... ?
           
         कागद-पेन तर घेतला पण लिहायचं काय..? आजकाल त्या कागदाशी अन् पेनाशी जमलेली गट्टी कधीही मला त्यांच्याजवळच खेचून नेतेय..वेळेचे भान न ठेवता..रात्री-अपरात्री उठून अगदी चक्क कागद-पेन घेऊन लिहिणाऱ्या माझ्यासारख्या मुलामधे हा 'अस्वाभाविक' बदल कसा झालाय हे मलाच कळणं मुश्कील झालंय..
वेगळ वेगळ करायचं म्हणतात ते असचं असत का..? 
मी अनुत्तरीच...

         अक्षर उमटत होते. शब्दही आकार घेत होते. पण प्रश्न होता लिहायचं काय..?
' लिहायचं का ' हे कळत नसुनही वळालं होत. पण त्या पुढच्या 'य' मुळे तयार झालेल्या प्रश्नाचा अडथळा येत होता.
        "अक्षराने शब्द बदलतो आणि शब्दाने अर्थ."  
अशी अवस्था अनेकांची होत असेल का..? प्रश्न वाढतच होते, उत्तरे सापडत नव्हती..
आणि...

         वपु धावुन आले. एका त्यांच्याच विचारानिशी..बरेच दिवसापुर्वी एक वाक्य वाचनात आल होत..
" माणसाला हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्तीच हवी असते."
त्यावेळी पुस्तकातून वाचलेलं हे वाक्य आज पुन्हा नजरेखालून गेलं. त्यावेळी संदर्भ  होता आज स्पष्टीकरण सापडलं. तेव्हा ते वाक्य खूप 'भारी' वाटलं होत. अर्थात आहेच. त्यात वादच नाही. पण तेव्हा त्यावर विचार करण्यापासुन मीच स्वतःला परावृत्त केल होत. का ते मलाही ठामपणे सांगता नाही येणार. अशा परिस्थितीमधल्या विचारांना कधी कधी उत्तरेही नकोशी वाटतात. म्हणून ते धजावत नाहीत, ती उत्तरे शोधायला..'ती' परिस्थितीही तशीच असेल...कदाचित..

        पण ते वाक्य खर होत. पुर्वार्धातलं तरी. लहानपणापासून बऱ्याच गोष्टी हरवल्या. कंपासपेटीमधील नटराजची एक पेन्सिल हरवली तरी तिची सर बॉक्स मधल्या नव्या पेन्सिलीला येत नसे. आपल्याला तीच हवी असायची. हरवलेली पेन्सिल...
आयुष्याच्या कंपासातही अशा पेन्सिल, पेन सारखी अनेक माणसे सापडतील. पण त्यामधे एखादा PERMANENT MARKER असतोच. ज्याची मनावर एक छाप असते.
न पुसणारी..आपणच गिरवलेली...
आणि असा आयुष्याच्या कंपासमधला MARKER च हरवला तर..?
त्याची म्हणजे त्या व्यक्तीची सर दुसऱ्याला येणं अशक्यच..दुसरा मिळाला तरी आपल्याला तोच हवाहवासा वाटतो. हरवलेला..स्वतःपासुन दुरावलेला...
त्याचे गुण-अवगुण, आचार-विचार, स्वभाव-विभाव हे त्यालाच साजेशे असतात. ते फक्त त्याचेच असतात.
त्याने घडवलेले असतात..कमावलेले असतात..आणि आपल्याला भावलेले असतात...
         क्षणाक्षणाला आपण मनावर ठासत असतो. एक गुण, एक विचार, एक स्वभाव त्या व्यक्तीचा..
मनाच्या कप्प्यात त्या हरवलेल्या पेन्सिलची आणि दुरावलेल्या व्यक्तीची जागा ती रिती झाल्यावरच कळतं.
दुर्दैवचं ते..पण मन शेवटी त्या जागेत ना कोणाला बसू देत ना स्वतःहुन कोणाला बसवत..त्या रित्या जागेमुळे सभोवतालच्या लोकांची नव्याने ओळख होते. दुरावण्याच्या भितीपोटी आणि एकटेपणाच्या विचाराने आपण त्यांना जपतो. त्यांची जागा रिती न होण्यासाठीच..एका जाणीवेपोटी...
" जीवन जगण म्हणतात ते हेच असेल कदाचित. या जीवनाच्या खेळात यश मिळेल पण त्याच महत्त्व अपयशाने कळतं. आनंदही होईल पण त्याच महत्त्व दु:खातुन गेल्यावरच कळतं. जवळीकताही असतेच पण त्या जवळीकतेच महत्त्व दुरावाच सांगुन जातो..."
अजबच प्रकार आहेत हे. विचारांच्या पलीकडचे..माझ्यातरी....

        नव्याने ओळख झालेल्या प्रत्येकाची आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जागा असतेच..कोणाची इंचभर तर कोणाची वितभर..इतकाच काय तो फरक..मला नव्याने कळालेला...
"ना त्या इंचभराच मोल वितभराला येत ना वितभराच इंचभराला.."
वपुंच्या वाचलेल्या त्या वाक्यातील 'पुर्वार्ध' मी लहानपणी अनुभवला होता..आणि 'उत्तरार्ध' मला आता समजायला लागलं होत...थोड थोडंस...

         'तिचं' पेन्सिल का..? ह्या आईने त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नसायचं..पण 'ती पेन्सिल माझी आहे' एवढच मी म्हणायचो. त्या पेन्सिलरुपी वस्तुशी एक नातं तयार होत असे..आपलेपणाची भावना त्यात गुंफल्या जायची..माझ्याही नकळत...
व्यक्तींचही तसचं असेल..फरक फक्त सजीवतेचा..मनाचा अन बुद्धीचा..आई सारख म्हणत असते...
"जवळच्यांच महत्त्व माणसाला नसतं..ते ती व्यक्ती दुरावल्यावरच कळतं.."
पण त्या मनाला एक आशा असते ती वस्तु अन् व्यक्ती सापडण्याची..आस असते त्यांना मिळविण्याची..
अन् एक विश्वास असतो त्यांना जपण्याचा...

आणि एक दिवस अचानक...
ती हरवलेली पेन्सिल सापडते अन् ती दुरावलेली व्यक्तीही मिळते...तो आनंद काही निराळाच. स्वतःची परिभाषाच बदलवून टाकणारा...आयुष्याला एक वळण देणारा..रंगविलेली स्वप्ने जगणारा..
तो क्षण....खरच असेल एक.....

TURNING POINT...???  

                                      - मकरंद

                                                                                                          ©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: