मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

".........."


                                                     ".........."


           बरेच दिवस झाले काही विशेष असं लिहिण्यातच आल नाही. जे लिहिलं त्याला सार्वजनिक स्वरूप द्याव अस मनाला वाटल नाही. मला सारख सारख वाटून जात होत, अनेकदा.. अनेकवेळी.. अनेकठिकाणी.. की मी लिहणं विसरलो का..? का मला आता सुचेनासच झालंय..?  हा Phase सगळ्यांच्या आयुष्यात येतो का..?
नानाविध प्रश्न डोक्यात गर्दी करायचे. पण त्या धावपळीत मीही त्या प्रश्नांना मनापर्यंत पोहचूच दिलं नाही.. त्याचा कौल त्यांना भेटूच दिला नाही. तो जर लवकर भेटला असता तर कदाचित हा गुंता नक्कीच सुटला असता. असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळाली असती. कारण गुंता हा सुटण्यासाठीच बनलेला असतो आणि प्रश्न उत्तराचीच वाट पाहत असतात. अन् मनाकडे तर अशा लागलेल्या सगळ्या प्रश्नांच्या कुलुपांची एकच चावी असते.. एकापाठोपाठ एकाला खोलणारी. A MASTERKEY...

           मनातील भावनांचा खेळ कागदावरही तेवढ्याच कुशलतेने खेळवता येणं, त्या शब्दांची Fielding तेवढीच पक्की लावणं, जेणेकरून स्वतःच आखलेल्या सीमारेषेच्या बाहेर मनातील भावनांना जाऊ न देणं हे कसबच असतं. ते कसब आपल्याला थोडसंच का होईना जमू शकतं असं वाटणं आणि तसच घडणं ही बाबही मनाला खूप समाधान देणारी आहे. "परावलंबी असणाऱ्या समाधानापेक्षा स्वावलंबी समाधान कधीही चांगल..कारण त्याचा त्रास दुसऱ्यांना होत नाही आणि त्याच्या आपल्याला भेटलेल्या आनंदाची तीव्रता आपल्याशिवाय दुसऱ्यांना कळत नाही." 

         कोणीतरी म्हणालं आहे "मन हे वेड असतं" ते अगदी खरयं.. मन हे वेडच असतं.. एका विचारानिशी किंवा कृतीनिशी ते अनेक स्वप्न रंगवत. त्या स्वप्नांची सीमा शोधूनही सापडत नाही. स्वप्नातही समाधान शोधण्याच्या कलेवर जणू काही फक्त त्याचच प्रभुत्व आहे.
दृश्य स्वरुपात न भेटणाऱ्या गोष्टींना अदृश्य स्वरुपात भेटण्याची ही कला म्हणजे स्वप्न..
त्या दृश्य वा अदृश्य भेटींच्या आनंदाला अनुभवणं म्हणजे समाधान..
अन् या सगळ्याचा अविभाज्य घटक असूनही स्वतःला कायमच अदृश्य स्वरूप देणारं एक न सुटणार कोडं म्हणजे आपलं मन..
आपल्यामध्ये एखादी नवी गोष्ट दिसली की ते स्वतःचा पवित्राच बदलत. माझ्याही बाबतीत तसच झालं..
जे दिसेल, जे ऐकेल त्यात लिहीण्यासारख काही सापडत का हे ते बघत होतं.. वेगवेगळ्या विषयांना ते स्पर्शून जात होत. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टीत रमताना मात्र वृद्धिंगत होत जाणाऱ्या स्वतःच्याच ज्ञानाच्या घड्याला ते बघूनही न बघितल्यासारख करत होत. त्याच्याशी एकरूप होत नव्हतं. ते फक्त रमत होत.. आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये.. एखाद्या अल्लड मुलासारखं...

       लिहावसं वाटणं आणि लिहिणं यांत फरक फक्त वाटलेलं लगेच करण्यात आहे. हे केवळ लिखाणातच नव्हे तर सगळ्याच बाबतीत खर ठरू शकत. पण मनाच्या जोडीला आलेली बुद्धीची सोबत त्याला कधी कधी कमकुवत बनवते, काही निर्णय लगेच प्रत्यक्षात उतरविण्यासाठी.. तर कधी कधी त्याला बळकटही बनवते, त्याच्या उत्सुकतेला आवश्यक तो लगाम घालून.. म्हणून महत्व त्या जोडीला आहे आणि या जोडीनेच मलाही समजावलं..पुन्हा एकदा.. खडसावून...

        प्रत्येक गोष्ट वेळेनुरूप बदलत जाते. भरती आलेलं पाणी जस ओहोटी मध्ये परत जात तसचं एखाद्या गोष्टीतील नाविन्य संपलं की त्यामधला उत्साह सुद्धा ओसरतो. जास्त जवळीकता वाढली की प्रेमही कमी झाल्यासारखं वाटत. एखाद्या घरात बरेच वर्ष राहील की ते घरही जुनं वाटू लागत. पण...
ओहोटीनंतर भरती येणारच.. कमी झालेल्या प्रेमामुळे आलेला मनांचा दुरावा त्यांच प्रेम तो स्वताहून वाढवणारचं.. अन् जुनाट झालेल्या घराला रंग दिल्यावर नाविन्य हे येणारच...

       लहानपणी आंधळी कोशिंबिरीच्या खेळात चारीदिशांना फिरून अनेकांमधील एकाला जरी पकडलं तरी आपल्यावरच राज्य वाचायचं. पण इतके साधे गणितं इथे चालतच नाहीत. देवसुद्धा आपल्याला त्याच्या दृष्टीने एका बंद असणाऱ्या खोलीत डोळ्यावर पट्टी बांधून पाठवत असतो. तो ज्या दरवाज्यातून पाठवतो त्याच्या पुढचा दरवाजा हा आपल्याला स्वतःहून शोधावा लागतो. तो सापडल्यानंतरचा आनंद वा समाधान जितकं मोठं असत तितकाच मोठा पेच पुढ्यात असतो. एक नवीन दरवाजा खोलण्याचा..
एका नवीनच खोलीचा.. आयुष्य.....

      आयुष्य हे असचं असत. एका गोष्टीचा सोक्ष-मोक्ष लावला की दुसरी समोरच उभी असते. एक काम लक्षपूर्वक केलं की दुर्लक्षित झालेलं दुसरं समोर येतच. कारण एक डोंगर चढला की दुसरा डोंगर हा दिसणारचं..
पण त्या यशस्वी कार्याच्या आनंदाला आणि समाधानाला मात्र आपण यछेच्छ अनुभवताना दिसत नाही. त्यातून मिळणारी उर्मी हवी तशी मनात साठवताना दिसत नाही.

     म्हणूनच आज या मनाने बुद्धीच्या सोबतीने एक नवीनच Mind Game माझ्यासोबत खेळला. माझ्याच मनात चालणाऱ्या खेळात त्याने मला सतर्कतेचा इशारा दिला अन् जाता जाता एक जुनाच बोध नवीन पद्धतीने त्याने देऊ केला. तो बोध....

    "एकाचवेळी असणाऱ्या गोष्टीतील आनंद उपभोगणं आणि त्या मिळणाऱ्या समाधानातून पुढच्या गोष्टीसाठी विजिगीषु वृत्तीने प्रयत्न करणं..."

  मनातील विचारांना कागदावर उतरवलं की खरंच 'मस्त' वाटत.. त्या 'मस्त' ला शब्दात फुलवणं मलाही जमत नाही..मी तरी काय करू...?

अरे बापरे..!! बरंच लिहिलं गेलंय नकळत..
हा लेख होऊ शकेल..?
मग शीर्षक काय..?

मन, बुद्धी, विचार, आयुष्य, खेळ की Just

UNTITLED....?

                               
                           - मकरंद

                                                                                               ©makarand92.blogspot.com

                             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: