शुक्रवार, २७ जून, २०१४

शेवटचं पान…

                        
                                     शेवटचं पान…  








                             कदाचित या diary मधल हे शेवटच लिखाण असेल..Pages संपत आलेत. पण मनाला मनातुन वाटतय की diary संपु नये. कालच जाऊन एक नवी diary आणली.पण ह्या diary सोबत जुळलेली नाळ अशीच त्या नव्या diary सोबत पण जुळेल ना...??
           खूप काही दिलस मला तु.. माझ्यातल्या साधे-सुधे अनुभव लिहिणार्या एका मुलाच्या ज्याला बरेच जण त्यांच्या दृष्टिने "लेखक" म्हणतायत त्याच्या मोडक्या-तोडक्या शब्दांना तु स्वत:वर झेललस..विस्कटलेल्या मातीला जसा कुंभार आकार देतो आणि त्यापासुन बनलेल्या भांड्याला किंमत देतो तशीच  माझ्या मोडक्या-तोडक्या शब्दांना आकार देऊन तु त्यांना लहानाच मोठ करत स्वत:च्या पायावर उभ केलस..त्या शब्दांना तुझ्यारुपानं किंमत भेटली..
         प्रत्येकाला स्वत:च सुख-दु:ख सांगण्यासाठी कोणीतरी हव असत..मला तु भेटलीस..
त्या मनात लपलेल्या गोष्टींना तुझ्या जवळ बोलण्यात मलाही पहिल्यांदा नकोस वाटायचं. पण त्या गोष्टी कोणालाही न सांगण्याचा तुझा माझ्यावरील विश्वास मलाही तुझ्याजवळ हळुहळु मोकळ करुन गेला...
         सुखाच्या वेळेस तू होतीस. ते क्षण पुन्हा माझ्यासमोर वारंवार ठेवल्यावर आणि मी ते वाचल्यावर खुप मस्त वाटायचे. ते क्षण पुन्हा अनुभवल्यासारखं वाटायचं. दु:खाच्या किंवा वाईट प्रसंगांच्या वेळी तू माझी खूप आधार बनुन राहिलीस. ते क्षण सुद्धा न चुकता वारंवार माझ्यासमोर आणलेस. पुन्हा त्या चुका माझ्या हातून होऊ नयेत म्हणुनच ना..? खरंच हे सगळं न बोलता, कोणालाही न सांगता, दिखाऊपणा न करता माझ्यासारख्या कित्येक जणांचा आधार बनलीयेस तु आणि माझ्या तर आयुष्याचा अविभाज्य घटक झाली आहेस तु . 
          "स्वतः स्वतःसाठी जगताना कधीतरी स्वतःकडेही स्वतःहून जाणुनबुजून पाहावं लागतं.''  त्यासाठीच आरसा बनवलाय. पण त्याला आपल्यासमोर योग्य वेळी धरणारही कोणीतरी असावं लागतं. माझ्यासाठी तु ती आरसा धरणारी झालीस. माझ्या लहानपणापासुन तु माझ्यासोबत होतीस. तुझ्यावर काहीही लिहिलं तरी ते तु हसतं हसतं झेलायचीस. नकळत, न सांगता तुझ्यातला हा गुण मला शिकायला भेटला. ५-६ वी मधल्या त्या आठवणी वाचून आजही पोट धरून हसू येत. किती वेडे होतो आपण हे बघुन जाम मजा येते. त्या जुन्या गोष्टीतुन एखादा नवीन धागाही मिळतो. जो आयुष्यातील विचारांच्या गाठीला अजुनच घट्ट करुन जातो. त्या वेळेस लिहिलेल्या पेनाच्या शाईला तु अजुनही पुसू दिलं नाहीस. त्यांना तसंच जपलस. त्या आठवणींना अजरामर केलंस. त्या क्षणांना मुर्त रूप दिलंस. 
खरंच तु Great आहेस...

                 कधी माझ्या मनातल्या भावना योग्य व्यक्तीपर्यंत 
                 पोहाचवायचं काम केलंस...
                 तर कधी त्या शब्दांनी एखाद्याच्या डोळ्यात पाणी आणलस...
                 वर्ष वर्ष दुर ठेवलं तुला तरी तु कधी रागावली नाहीस...
                 गरज पडली तेव्हा वापरलं तुला तरी तू कधी बोलली नाहीस...
                 तुझ महत्व फक्त लिहिणार्यालाच कळतं असतं...
                 कारण तुला सार्वजनिक रूप येऊ नये म्हणुन त्याने तुला स्वतःपेक्षाही 
                 जास्त जपलेलं असतं...
                 तू आहेस म्हणून मन स्वच्छ होतंय...
                 तू आहेस म्हणून गप्पा मारल्यासारखं वाटतंय...
                 तू आहेस म्हणून आठवणींना उजाळा मिळतोय... 
                 अन् तू आहेस म्हणूनच माझ्यातला मी नव्यानेच मला कळतोय...

            या सगळ्यासाठी 'धन्यवाद' म्हणून मला तुला माझ्यापासुन दुर करायचं नाहीये. ती कृतदयनता असावीच. पण त्या कृतदयनते मधेही मला कृतघ्नतेचा भास होतोय. म्हणुन तुझ्या ऋणात राहणंच मी पसंद करेन.
            कविता,गोष्टी,अनुभव,घटना,आनंदोत्सव या सगळ्या गोष्टींमध्ये तु होतीस पण कधीच दिसली नाहीस. काही काही माणसांच्या आयुष्याला वयाची मर्यादा नकोशी वाटते. अगदी तशीच तुला आलेली पानांची मर्यादा मला नकोशी वाटतेय. पण काळ कधीतरी येतोच त्या वेळेला सोबत घेऊन. वपुंसारख्या एका थोर लेखक अन् कथाकथनकाराने आजच्या दिवशीच देह ठेवला आणि स्वतःच्या धावत्या वयाला स्तब्धता दिली.
 कायमचीच. 
         तुझ्या पानांच्या मर्यादेने आज मला तुझ्यावर लिहिण्यापासुन थांबवलंय. आज त्या मर्यादेला मीही थांबवु शकत नाहीये. पण आठवणी मात्र राहतीलच.तुझ्यासहित...

            उद्यापासून एक नवी diary, एक नवी सुरवात, एक नवा अध्याय...
            तुझ्यासोबतच… 


                          - मकरंद

                                                                                                      ©makarand92.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: